Sun, Sep 22, 2019 22:00होमपेज › National › लोकसभा निकालापूर्वी 'ईव्हीएम'वरून विरोधकांकडून रणकंदन

लोकसभा निकालापूर्वी 'ईव्हीएम'वरून विरोधकांकडून रणकंदन

Published On: May 21 2019 9:06PM | Last Updated: May 21 2019 9:06PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी २२ विरोधी पक्षांतील नेत्यांनी आज, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व्हावी तसेच मतमोजणीपूर्वी व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली.

यावेळी काँग्रेस, डीएमके, टीडीपी आणि बीएसपीच्या नेत्यांनी मिळून निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले. २३ मे रोजी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी कोणत्याही क्रमाविना निवडलेल्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. तर निवडणूक आयोगाने 'स्ट्राँग रूम'मध्ये ठेवलेल्या ईव्हीएमच्या सुरक्षेवरून उपस्थित केलेल्या शंका फेटाळून लावल्या आहेत.

ईव्हीएमच्या छेडछाडीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही ठिकाणी निदर्शने होत आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने अशाप्रकारच्या घटना खोट्या असल्याचे म्हटले आहे.

मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्स 'स्ट्राँग रूम'मध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत नेण्यात आले. ते डबल लॉक्सने सील केले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण केले आहे. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सीसीटीव्हीची नजर राहील. 'स्ट्राँग रूम'च्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलिस दलाचे जवान तैनात केले आहेत. 'स्ट्राँग रूम'वर २४ तास नजर ठेवली जात आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.