अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत एकतर्फी कारवाई करता येणार नाही | पुढारी 
Tue, Aug 21, 2018 03:32होमपेज › National › अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत एकतर्फी कारवाई करता येणार नाही

अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत एकतर्फी कारवाई करता येणार नाही

Published On: May 17 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 1:06AMनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कोणत्याही आरोपीविरोधात एकतफीर्र् कारवाई करता येणार नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी यासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान नोंदविले. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीसंदर्भात निर्देश दिले होते.  त्यात आरोपीला तातडीने अटक न करणे आणि जामीन मिळण्याची तरतूद करण्यात आली होती. त्याविरोधात देशभरातील दलित संघटनांनी नाराजी व्यक्‍त केली होती. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करीत ते निर्देश रद्द करण्याची विनंती केली होती.

यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने एकतर्फी कारवाई करून कोणासही तुरुंगात डांबता येणार नाही, असे निरीक्षण नोंदविले. आपण सुशिक्षित समाजात राहत असून, कोणालाही एकतर्फी म्हणणे ऐकून तुरुंगात टाकणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्‍तीस न्याय्य वागणूक मिळावी आणि त्यांचे स्वातंत्र्य जपले जावे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. घटनेच्या कलम 21 नुसार व्यक्‍तीस ते स्वातंत्र्य प्राप्‍त झाले असून, त्याविरोधात कायदा करण्याचा अधिकार संसदेसही नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता जुलै महिन्यात होणार आहे.