Sat, Apr 04, 2020 17:18होमपेज › National › स्वराज्यातील तीन दुर्ग; राजगड, रायगड, सिंधुदुर्ग

स्वराज्यातील तीन दुर्ग; राजगड, रायगड, सिंधुदुर्ग

Last Updated: Feb 19 2020 1:14AM
 भगवान पां. चिले
(इतिहास संशोधक, महाराष्ट्र राज्य दुर्गसंवर्धन समिती सदस्य)

शिवरायांनी स्वराज्याची उभारणी करताना 208 गड-किल्ले जिंकले. रायगडसारखा बुलंद गड, सिंधुदुर्गसारखा जलदुर्ग आदींची उभारणी हे त्यांच्या दूरद‍ृष्टीचे निदर्शक होय.

गडपती म्हणून ओळख असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, वास्तव्य, राज्याभिषेक व मृत्यू किल्ल्यांवरच झाला. शिवरायांची 1630 ते 1680 ही कारकीर्दच मुळी ‘गड-किल्ल्यांचा सुवर्णकाळ’ म्हणून मानली जाते. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच तोरणा ऊर्फ प्रचंडगडाची दुरुस्ती करत असताना, त्यांना तटामध्ये गुप्‍तधन मिळाले. या जाणत्या राजाने त्या धनाचा वापर यथायोग्य पद्धतीने करताना तोरण्यापासून जवळच असणारा मुरुंबदेवाचा डोंगर ताब्यात घेऊन त्याला भक्‍कम करण्याचे काम आरंभले. हे 1646-47 साली सुरू झालेलेे काम पुढे 1664 पर्यंत चालूच होते.

शिवपूर्वकाळात राजगडला पद्मावती माची सोडल्यास दुसरी माची नव्हती. राजांनी पुढे या गडाला सुवेळा, संजीवनी अशा भक्‍कम माच्या बांधल्या. दुहेरी तटबंदी व चिलखती बुरुजांच्या सहाय्याने शिवरायांनी राजगड लढाऊद‍ृष्ट्या इतका भक्‍कम केला, की ते खुद्द 24 वर्षे या गडावर आपल्या कुटुंबकबिल्यासह मुक्‍काम करून राहिले. या गडाच्या पायथ्याला त्यांनी ‘शिवा पट्टण’ नावाचे गाव वसवले. तेथे त्यांनी राजवाडा, विहिरी बांधल्या. खुद्द राजगडाच्या पद्मावती माचीवर दुसरा वाडा बांधला व याशिवाय राजगडाच्या बालेकिल्ल्यावर त्यांनी तिसरा वाडा बांधला. या तिन्ही ठिकाणी ते गरजेनुसार, सभोवतालची परिस्थिती पाहून राहात असत. 

राजगडच्या बालेकिल्ल्यासारखा ‘बुलंद, बेलाग’ या शब्दांना साजेसा दुसरा बालेकिल्‍ला नाही. राजगडाच्या बालेकिल्ल्याचे पंचकोनी प्रवेशद्वार, वरील चंद्रकोर तळे, जननी-ब्रह्मर्षी मंदिर, राजवाडा, गडाच्या सुवेळा-पद्मावती-संजीवनी या माच्या, गडाचे पाली दरवाजा, बिनी दरवाजा, गुंजवणे दरवाजा व अनेक गुप्‍त दरवाजे प्रत्येक दुर्गप्रेमी व्यक्‍तीने ‘याची देही याची डोळा’ अनुभवायला हवेत, असेच आहेत. एखादा लढाऊ गिरीदुर्ग, कमीत कमी जागेत किती कौशल्यपूर्ण पद्धतीने बांधता येऊ शकतो, याचे उदाहरण म्हणून राजगड पहायलाच हवा. राजगड तसा विस्ताराने प्रचंड आहे; पण त्याच्या माथ्यावर सपाटी फार कमी आहे, तरीही ‘राजगडासारखा गड राजगडच’ होय.

मालवणच्या पुढ्यात भर समुद्रात असणार्‍या कुरटे बेटाचे शिवरायांनी निरीक्षण केले व या जागेचे सामर्थ्य जाणून त्यांनी “चौर्‍याऐंशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही!” असे गौरवोद‍्गार काढले. त्यांनी सहकार्‍यांना आज्ञा केली, ‘इथे बंदरी नूतन जंजिरा वसवावा.’ 500 पाथरवट, 200 लोहार, तीन हजार मजूर, तब्बल तीन वर्षे दिवस-रात्र खपले. पायाचे दगड पाच खंडी शिशाच्या रसात बसविले. सुरत लुटून आणलेले तब्बल एक कोटी होन सिंधुदुर्ग बांधण्यास खर्ची पडले. 29 मार्च 1667 रोजी शिवराय मालवणला जातीने आले. सुमुहूर्त पाहून त्यांनी गडप्रवेश केला. त्यांच्या स्वागतार्थ गडावरील तोफांना बत्ती देण्यात आली. शर्करा वाटली. बांधकामात भाग घेणार्‍यांना यथायोग्य बक्षिसे देण्यात आली. बखरकारांनी या भेटीचे वर्णन बहारदारपणे केले आहे. “सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मानी तारा, जैसे मंदिराचे मंडन श्रीतुलसी वृंदावन तैसा महाराजांचे राज्याचा भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकी पंधरावे रत्न महाराजांस प्राप्‍त झाले.”

सिंधुदुर्ग 4 कि.मी. परिसरात पसरलेला असून, तटबंदीची उंची साधारणत: 35 फूट, तर रुंदी 10 फूट आहे. गडाच्या घेर्‍यात तब्बल 42 बुरूज असून, गडाच्या तटावर जाण्यासाठी 45 जिने बांधलेले आहेत. या गडावरील खुद्द शिवछत्रपतींचे शिवराजेश्‍वर मंदिर, त्यांच्या हाता-पायाच्या ठसा असलेल्या घुमट्या, महादेव मंदिर, वेताळ मंदिर, मारुती मंदिर, भगवतीदेवी मंदिर, राणीचा वेळा हे ठिकाण, गोड्या पाण्याची विहीर, गोमुखी महाद्वार, नगारखाना अशा सर्व वास्तू डोळे भरून अनुभवाव्या अशाच आहेत.

या मालिकेत आवर्जून अभ्यासावा, अनुभवावा असा गड म्हणजे दुर्गराज रायगड होय. हा गड ताब्यात घेऊन हिरोजी इंदुलकरांनी इतका भव्य-दिव्य बुलंद बनविला, की हा गड पाहून इंग्रज वकील टॉमस निकोलसने लिहून ठेवले आहे. हा किल्ला इतका अभेद्य बनविला आहे, की अन्‍नाचा भरपूर पुरवठा झाल्यास हा किल्‍ला अगदी अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढू शकतो. रायगडचा चित्त दरवाजा, नाने दरवाजा, खुबलढा बुरूज, बुलंद महाद्वार, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, कुशावर्त तलाव, काळा हौद, मनोरे, जगदीश्‍वर मंदिर, व्याडेश्‍वर महादेव मंदिर, बाजारपेठ, आई शिर्काई मंदिर, वाघ दरवाजा अशा एक ना अनेक वास्तू म्हणजे दुर्ग अभ्यासकांसाठी पर्वणीच होय. त्यातच रायगडावरील सिंहासन चौथर्‍यावरील पवित्र मेघडंबरी, शिवछत्रपतींची समाधी म्हणजे साक्षात पंढरीच होय. खुद्द शिवरायांनी या गडाचा डोंगर प्रथम पाहिल्यावर ते बोलले त्याचे वर्णन उपलब्ध आहे. “राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचे ताशीव कडे तासिल्याप्रमाणे, दीड गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावरी गवत उगवत नाही आणि धोंडा ताशीव एकच आहे (असाचखोट) दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा; परंतु तो उंचीने थोडका, दौलताबादचे दशगुणी गड उंच. असे देखोन बहुत संतोष्ठ जाले आणि बोलिले तक्‍तास जागा गड हाच करावा.” असा रायगड शिवसमाधीमुळे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकास प्रिय आहे, वंदनीय आहे.