Tue, Oct 24, 2017 16:58
29°C
  Breaking News  

होमपेज › National › नितीशकुमारांना ‘एनडीए’मध्ये येण्याचे निमंत्रण!

नितीशकुमारांना ‘एनडीए’मध्ये येण्याचे निमंत्रण!

Published On: Aug 13 2017 2:25AM | Last Updated: Aug 13 2017 2:09AM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संयुक्‍त जनता दलाला राष्ट्रीय राजकारणात आता पुढे चाल खेळण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये ‘जेडीयू’ने सहभागी व्हावे, असे निमंत्रण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ट्विटरवरून दिले. तर त्याच वेळी शरद यादव यांना राज्यसभेतील पक्षनेते पदावरून हटविण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी जाहीर केला.
शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यानंतर शनिवारी अमित शहा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून नितीशकुमार यांना ‘एनडीए’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. बिहारमध्ये ‘जेडीयू’ने राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. यामुळे आता ‘जेडीयू’ला अधिकृतपणे ‘एनडीए’चा घटकपक्ष करण्याची तयारी सुरू झाली आहे.

याच दरम्यान नितीशकुमारांच्या जदयुमध्ये मोठा संघर्ष उभा राहत आहे. नितीश कुमारांच्या भूमिकेवर पक्षाचे नेते शरद यादव यांनी नाराजी व्यक्‍त केल्याचे निमित्त घडले आणि यादव  पक्षविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप ठेवत राज्यसभेतील पक्षनेतेपदावरून त्यांना दूर करण्यात आले आहे. शनिवारी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांची पक्षाच्या खासदारांनी भेट घेत राज्यसभेतील नेते बदलण्यासाठी पत्र दिले आहे. खासदार रामचंद्र प्रसाद सिंह यांची या पदावर निवड करावी, अशी मागणी करण्यात आली. शरद यादव कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.