डोवालांचा दिल्लीत हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा; पीडितांची घोषणाबाजी 

Last Updated: Feb 26 2020 6:38PM
Responsive image
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा करीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी स्थानिकांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी मौजपूर, जाफराबाद तसेच घोंडा परिसराची पाहणी केली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन तसेच हिंसाचारावेळी पोलिसांच्या आणि सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करीत घोंडा परिसरात हिंसाचार पीडितांनी डोवाल यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सीलमपूर परिसरातील पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात दुपारी डोवाल पोहोचले होते. यापूर्वीच त्यांनी जाफराबाद, सीलमपूर सह उत्तर-पूर्व दिल्ली परिसराचा दौरा केला. 

डोवाल यांनी मंगळवारी रात्रीपासूनच दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत रात्रीपासून अनेक भागांचा दौरा केला. स्थिती पूर्णता: नियंत्रणात आहे. तसेच नागरिक समाधानी असून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांवर पूर्ण त्यांचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

तसेच यावेळी डोवाल यांनी पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आदेश दिल्याचे सांगत पोलिस त्यांचे काम योग्यरित्या करीत आहेत असे त्यांनी सांगितले आहे. तर यावेळी स्थानिकांनी, पोलिस त्यांचे काम योग्यरित्या करत नाही. नागरिक दहशतीत जगत आहे. मदतीसाठी ओरड करूनही पोलिसांकडून कुठलेही सहकार्य मिळाले नाही, अशी तक्रार डोवाल यांच्याकडे केली.

दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विशेष आयुक्त कायदा व सुव्यवस्था म्हणून एस. एन. श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी तात्काळ आपल्या पदाचा पदभार घेत श्रीवास्तव यांनी जाफराबाद परिसराचे निरीक्षण करीत स्थानिकांसोबत संवाद साधला. तसेच दिल्लीतील पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एस.डी. मिश्रा, एम.एस. रंधावा, पी. मिश्रा, एस. भाटिया तसेच राजीव रंजन यांचा त्यात समावेश आहे. संजय भाटिया यांची मध्यचे पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिंसाचारग्रस्त भागामध्ये निमलष्करी दलाच्या ४५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यावेळी निमलष्करी दलाचे जवान पोलिस कर्मचाऱ्यांसोबत परिसरात गस्त घालतांना दिसून आले. 

गोकुलपूरीत जाळपोळ 

सोमवारपासून बाजारातील दुकानांची जाळपोळ सुरु असून आज बुधवारी सकाळी गोकुलपूरीत ​भंगार बाजारात असलेल्या दुकानाला (क्रमांक १५) अज्ञातांनी आग लावली. मात्र, सुरक्षेअभावी अग्श्निशमन बंब परिसरात पोहोचू शकले नाही. त्यामुळे दुकान पूर्णत: जळून खाक झाले. पोलिस सुरक्षेत सकाळी अग्निबंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांनी आग आटोक्यात आणली. तसेच बृजपूरी परिसरात एका घराला आग लावण्यात आल्याची माहिती समोर आली. 

शांतता समितीची बैठक आणि पोलिसांचा मार्च 

दिल्लीत वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाहदरातील उस्मनपूरमध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी शांतता समितीची बैठक घेतली. तसेच नागरिकांना शांततेचे आवाहन करत पोलिसांनी दिल्लीतील रस्ता क्रमांक ६६, ब्रम्हपूरी रोड, घोंडा रोड, जाफराबाद, वेलकम तसेच भजनपूरामध्ये मार्च काढला.