Fri, Nov 24, 2017 19:58



होमपेज › National › उपराष्ट्रपतिपदासाठी ‘रालोआ’तर्फे नायडू

उपराष्ट्रपतिपदासाठी ‘रालोआ’तर्फे नायडू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय शहर विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असतील. भाजप संसदीय पक्षाच्या सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या नावाची घोषणा केली. ‘रालोआ’तील घटक पक्षांनी नायडू यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस प्रणीत आघाडीने या पदासाठी प. बंगालचे माजी राज्यपाल आणि म. गांधी यांचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच केली आहे. संख्याबळाचा विचार करता या निवडणुकीत व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित मानला जातो. ते विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची जागा घेतील. त्यांची मुदत पुढील महिन्यात संपत आहे. त्यांच्या व्यापक अनुभवाचा विचार करता ते राज्यसभेचे कामकाज प्रभावीपणे हाताळतील, असा विश्‍वास अमित शहा यांनी व्यक्‍त केला. दरम्यान, दक्षिणेकडील राज्यांत आपली स्थिती मजबूत करण्याच्या इराद्यानेच भाजपने नायडू यांचे नाव निश्‍चित केल्याचे राजकीय निरीक्षक मानतात.  राष्ट्रपतिपदासाठी 5 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे.