नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बहुतांश दूरसंचार कंपन्यांनी डिसेंबरपासून मोबाईल आणि इंटरनेट सेवाशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणपणे मोबाईल, इंटरनेट सेवांच्या शुल्कात 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास दूरसंचार कंपन्यांमध्ये सहमती झाल्याचे वृत्त आहे.
एअरटेल, जिओ, व्होडाफोन, आयडिया आदी कंपन्यांनी मोबाईल सेवाशुल्कात वाढ करण्याबाबतच्या कारणांची गेल्या आठवड्यात माहिती दिली होती. कंपन्यांमधील स्पर्धेमुळे गेल्या वर्षभरापासून मोबाईल, इंटरनेट सेवाशुल्कात वाढ करण्यात आली नव्हती. डिसेंबरपासून मात्र साधारण सेवाशुल्कात 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय बहुतांश कंपन्यांनी घेतल्याचे समजते. भारतात इंटरनेट वापरणार्या कोट्यवधी ग्राहकांना नव्या दरवाढीची झळ बसणार आहे. शहरी भागासह ग्रामीण भागामध्येही मोबाईल आणि इंटरनेट सेवांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. देशात वायरलेस सबस्क्रायबरची संख्या 1173.75 दशलक्ष आहे. 514.56 दशलक्ष ग्राहक ग्रामीण भागातील आहेत. छोटा प्लान असल्यास सेवाशुल्कात कमी वाढ होईल. मोठा प्लान असल्यास अधिक सेवाशुल्क मोजावे लागणार आहे. बहुतांश कंपन्यांनी सेवाशुल्कातील वाढीमध्ये एकसमानता ठेवण्यास सहमती दर्शविल्याचे समजते. त्यामुळे पोस्टपेडपेक्षा प्री-पेड ग्राहकांना शुल्क वाढीचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.