Tue, Jul 23, 2019 12:37होमपेज › National › मिशेलच्या अटकेने काँग्रेसची झोप उडाली; भाजपची टीका

‘मिशेलच्या अटकेने काँग्रेसची झोप उडाली’

Published On: Dec 07 2018 1:51AM | Last Updated: Dec 07 2018 1:51AM
नवी दिल्ली :  पुढारी वृत्तसेवा

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील दलाल ख्रिश्‍चन मिशेल यास भारतात आणल्यानंतर काँग्रेसमधील एका कुटुंबांची झोप उडाली आहे. काँग्रेसचा हात ख्रिश्‍चन मिशेलसोबत असून त्याच्या बचावासाठी काँग्रेसने वकिलांची फौज उतरविली आहे, अशी बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्‍ते डॉ. संबित पात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

संबित पात्रा म्हणाले की, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील दलाल ख्रिश्‍चन मिशेल याला भारतात आणल्यामुळे काँग्रेससह पक्षातील एका कुटुंबाची झोप उडाली आहे. काँग्रेसचे नेते दु:खी झाले आहेत. त्यामुळे ख्रिश्‍चन मिशेलचा बचाव करण्यासाठी काँग्रेसने वकिलांची फौज कामाला लावली आहे. काँग्रेसचा हात दलाल ख्रिश्‍चन मिशेलसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ख्रिश्‍चन मिशेल यास 10, जनपथच्या इशार्‍यावरून वाचविण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगत पात्रा पुढे म्हणाले की, अल्जो के. जोसेफ या युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यासह विष्णू शंकर आणि श्रीराम प्रकट हे अन्य दोन वकील मिशेलची बाजू मांडत आहेत. त्यापैकी विष्णू शंकर यांचे वडील काँग्रेसचे नेते आहेत, तर श्रीराम प्रकट हेदेखील काँग्रेसशी संबंधित आहेत. अल्जो जोसेफ यांना पक्षातून काढून टाकण्याची कृती म्हणजे केवळ नाटक आहे, असेही पात्रा म्हणाले.

संपुआ सरकारमधील नेत्यांना लाच दिली नाही: मिशेल  

व्हीव्हीआयपी व्यक्‍तींच्या हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्‍चन मिशेलने संपुआ सरकारमधील कुठलाही नेता किंवा संरक्षण मंत्रालयातील कुठल्याही अधिकार्‍याला लाच दिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे; पण सल्‍लामसलत फी म्हणून ऑगस्ट वेस्टलँडकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून ही हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आली होती.

मूळ ब्रिटिश नागरिक असलेल्या ख्रिश्‍चन मिशेलचे मंगळवारीच सौदी अरेबियाने कुठल्याही अटी-शर्तीशिवाय भारताला प्रत्यार्पण केले. त्याला सीबीआय न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. ख्रिश्‍चनचे हस्ताक्षर असलेल्या चिठ्ठ्यांमध्ये पैसे दिल्याचा उल्‍लेख आहे, पण आता त्याने मी डिस्लेक्सिक आजाराचा रुग्ण असून लिहू शकत नाही, असा दावा केला आहे. ज्या चिठ्ठ्यांमध्ये राजकीय नेते आणि नोकरशहांना पैसे दिल्याच्या नोंदी आहेत, त्या गुइडो हास्चके या युरोपियन मध्यस्थाने लिहिल्याचा दावा त्याने केला आहे.

ख्रिश्‍चन मिशेल या लाच प्रकरणाची जबाबदारी गुइडो हास्चकेवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून त्याला स्वत:ला आणि भारतात ज्यांच्याबरोबर त्याचे संबंध आहेत त्यांना वाचवता येईल, असे सीबीआय अधिकार्‍याने सांगितले. आमच्याकडे काही व्यवहारांची कागदपत्रे असल्याचे समजल्यानंतर तो थोडा आक्रमक झाला, असे अधिकार्‍याने सांगितले.