Sun, Jul 21, 2019 12:43होमपेज › National › हेमामालिनी, राज बब्बर यांच्यामुळे मथुरा, फतेहपूर सिकरी चर्चेत

हेमामालिनी, राज बब्बर यांच्यामुळे मथुरा, फतेहपूर सिकरी चर्चेत

Published On: Apr 16 2019 2:14AM | Last Updated: Apr 15 2019 10:52PM
 नरेश पवार

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे राज्य मानल्या जाणार्‍या उत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यांत मतदान होत असून दुसर्‍या टप्प्यात येत्या गुरुवारी नगीना, अमरोहा, बुलंद शहर, अलिगड, हाथरस, मथुरा, आगरा आणि फतेहपूर सिकरी या आठ मतदारसंघांत मतदान होत आहे. सन 2008 साली नव्याने बनवण्यात आलेल्या नगीना लोकसभा मतदारसंघात गतवेळी भाजपच्या यशवंत सिंग यांनी विजय प्राप्‍त केला होता. यावेळी या मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने पुन्हा एकदा यशवंत सिंग यांच्यावर विश्‍वास टाकला आहे. सपा-बसपा आघाडीतर्फे बसपाचे गिरीशचंद्र तर काँग्रेसकडून ओमवती देवी हे निवडणूक लढवित आहेत. बिजनोरमधून 2008 साली नगीना मतदारसंघ वेगळा करण्यात आला होता. पहिल्याच निवडणुकीत सपाच्या यशवीर सिंग यांनी बसपाच्या रामकिशन सिंग यांचा पराभव केला होता. गतवेळी म्हणजे 2014 साली भाजपच्या यशवंत सिंग यांनी सपाच्या यशवीर सिंग यांचा पराभव केला होता. मतदारसंघातील 21 टक्के लोक अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. मुस्लिम मतदारांची संख्या 50 टक्के इतकी आहे. 

अमरोहा मतदारसंघ आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. 2014 साली भाजपच्या कुंवर सिंग तंवर यांनी येथून विजय मिळवला होता. यावेळी पक्षाने पुन्हा त्यांना तिकीट दिले आहे. सपा-बसपा आघाडीकडून कुंवर दानिश अली तर काँग्रेसकडून सचिन चौधरी हे मैदानात आहेत. तुर्क समाजाच्या मुस्लिम समाजाची वस्ती अमरोहा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा फायदा घेण्याचा सपा-बसपाचा प्रयत्न आहे. मुरादाबाद क्षेत्रात मोडणार्‍या अमरोहा मतदारसंघात एकूण पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. बुलंदशहर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. हा मतदारसंघ मेरठ विभागात मोडतो. गतवेळी भाजपच्या भोला सिंग यांनी येथून विजय मिळवला होता. भोला सिंग यांना 6 लाखांपेक्षा जास्त मते पडली होती तर विरोधी बसपाच्या प्रदीप कुमार जाटव यांना 1 लाख 82 हजार मते पडली होती. भाजपने पुन्हा एकदा भोला सिंग यांना संधी दिली असून काँग्रेसने बन्सी सिंग, बसपाने योगेश वर्मा यांना तिकीट दिले आहे. गोहत्येनंतर उसळलेल्या दंगलीदरम्यान बुलंदशहरमध्ये एका पोलिस अधिकार्‍याची हत्या झाली होती. तेव्हापासून येथून वातावरण तणावग्रस्त आहे. अलिगड लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. ब्रिटिश-मराठा यांच्यादरम्यान झालेल्या दुसर्‍या युद्धासाठी अलिगड ओळखले जाते. दिल्‍लीपासून 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिगडमध्ये गतवेळी भाजपच्या सतीश कुमार यांनी विजय मिळवला होता. येथील 62 टक्के लोक हिंदू समाजातले असून मुस्लिम आणि जैनांनी संख्याही लक्षणीय आहे. बसपाने यावेळी अजित बाल्यान यांना तिकीट दिले आहे. भाजपचे सतीश कुमार विरुद्ध बसपाचे बाल्यान यांच्यात येथे मुकाबला होत आहे. काँग्रेसचे विजेंद्रसिंग चौधरी, आम आदमी पक्षाचे सतीश शर्मा हेही मैदानात आहेत. हाथरस लोकसभा मतदारसंघात गतवेळी राजेशकुमार दिवाकर यांनी विजय मिळवला होता. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. राज्याच्या अलिगड विभागात हा मतदारसंघ येतो. गतवेळी दिवाकर यांनी बसपाच्या मनोजकुमार सोनी यांचा पराभव केला होता. दिवाकर यांना 5 लाखांपेक्षा जास्त मते पडली होती तर सोनी यांना 1 लाख 75 हजार मते पडली होती. भाजपने यावेळी राजीव सिंग वाल्मिकी यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसकडून त्रिलोकीराम दिवाकर हे मैदानात असून सपाकडून रामजीलाल सुमन हे मैदानात आहेत. 

सिनेस्टार व भाजपच्या खासदार हेमामालिनी यांच्यामुळे मथुरा मतदारसंघ नेहमी चर्चेत असतो. गतवेळच्या विजेत्या हेमामालिनी यांना पक्षाने पुन्हा तिकीट दिलेले आहे. शेतात गहू कापत असल्याच्या व ट्रॅक्टर चालवत असल्याच्या हेमामालिनी यांच्या फोटोची चर्चा नुकतीच रंगली होती. श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत सतत भाविकांची गर्दी असते. देशातल्या ऐतिहासिक शहरांमध्ये मथुरा तसेच त्याला लागून असलेल्या वृंदावन आणि गोकुळ यांचा समावेश होतो. राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांचा गतवेळी हेमामालिनी यांनी पराभव केला होता. हेमामालिनी यांना 5 लाख 75 हजार मते; तर चौधरी यांना 2 लाख 43 हजार मते मिळाली होती. मथुरा मतदारसंघात एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. त्यात हेमामालिनी यांच्यासह काँग्रेसचे महेश पाठक, राष्ट्रीय लोकदलाचे कुंवर नरेंद्र सिंग यांचा समावेश आहे. सपा-बसपाचा सिंग यांना पाठिंबा आहे. मेरठमध्ये आयपीएस अधिकारी असलेल्या प्रीता हरित यांनी अधिकारीपदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने त्यांना आगरामधून संधी दिली आहे. 

आगरा मतदारसंघाला लागून असलेल्या फतेहपूर सिकरी मतदारसंघात यावेळी काँग्रेस पक्षाने सिनेअभिनेते व माजी खासदार राज बब्बर यांना मैदानात उतरवले आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाबूलाल यांनी येथून विजय प्राप्‍त केला होता. त्यांनी बसपाच्या सीमा उपाध्याय यांचा पराभव केला होता. बाबूलाल यांना सव्वाचार लाख मते पडली होती तर उपाध्याय यांना अडीच लाख मते पडली होती. भाजपने यावेळी बाबूलाल यांना तिकीट नाकारत राजकुमार चाहेर यांना संधी दिली आहे. 

काँग्रेसकडून राज बब्बर मैदानात असून बसपाने राजवीर सिंग यांना तिकीट दिले आहे. राज बब्बर यांच्या उमेदवारीमुळे येथील निवडणूक चुरशीची बनली आहे. आगरा मतदारसंघात दोनवेळा विजय मिळवलेल्या राज बब्बर यांनी याआधी 2009 साली येथून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.