Fri, Nov 24, 2017 20:06होमपेज › National › औरंगाबादचे 32 पर्यटक नशिबानेच बचावले

बद्रीनाथला दरड कोसळली १५ हजार पर्यटक अडकले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डेहराडून/नाशिक : वृत्तसंस्था / प्रतिनिधी

उत्तराखंडमध्ये मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या चारधाम यात्रेवर शुक्रवारी मोठे विघ्न कोसळले. बद्रीनाथ-जोशीमठ दरम्यान प्रचंड दरडी कोसळून महामार्ग बंद पडल्याने किमान 13500 यात्रेकरू अडकून पडले असून, त्यातील औरंगाबादचे 32 पर्यटक नशिबानेच बचावल्याचे वृत्त आहे.

उत्तराखंडमध्ये वर्षाकाठी चारधाम यात्रेला लाखो भाविक लोटतात. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री असा हा चारधाम प्रवास सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी बद्रीनाथ आणि जोशीमठ दरम्यान, दरडी कोसळण्यास सुरूवात झाली. राष्ट्रीय महामार्गावर फक्त सहा मीटर परिसरात या दरडींनी ठाण मांडले व वाहतूक ठप्प करून टाकली. कोसळलेल्या दरडी आकाराने महाकाय असल्याने त्या हटवल्याशिवाय मार्ग मोकळा होणार नसल्याचे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अधिकार्‍यांनी सांगितले.    

औरंगाबादचे 32 पर्यटक शुक्रवारी हेरंब टॅ्रव्हल्सच्या बसने बद्रीनाथकडून हरिद्वारकडे निघाले होते. वाटेत एका ठिकाणी प्रथम दगड-माती रस्त्यावर घसरत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने बस मागे घेतली. यानंतर काही क्षणातच या वाहनापासून सुमारे 10 फुटांवर डोंगराचा मोठा कडा रस्त्यावर येऊन कोसळला. मात्र, बस अलीकडेच थांबवण्यात आल्याने भाविक सुदैवाने बचावले.

दरड कोसळल्यामुळे हरिद्वारकडे जाणारा मार्ग बंद पडल्याने बसमधील पर्यटकांची सहा किलोमीटर अलीकडे पांडुकेशर गावात राहण्याची सोय करण्यात आल्याची माहिती हेरंब टॅ्रव्हल्सचे संचालक मंगेश कपोते यांनी दै. ङ्गपुढारीफशी बोलतांना दिली.

बद्रीनाथ मार्ग बंद पडल्याने हजारो पर्यटकांंनी सुरक्षितता म्हणून या भागातील जवळच्या गावांमध्ये हॉटेलची वाट धरली. परंतु, हॉटेल चालकांनी रूमच्या दरात 800 वरून पाच हजार रुपयांपर्यंत वाढ केली. स्थानिक रुग्णालयांच्या प्रशासनेही मदत नाकारल्याने नागरिकांची पंचाईत होत आहे. स्थानिक प्रशासनाने घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन गोविंद घाट येथील एका गुरूद्वारामध्ये दीड ते दोन हजार पर्यटकांच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र, असे असले तरी अनेकांना वेळेवर मदत न मिळाल्याने रस्त्याच्या बाजूलाच रात्र काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान, दरड कोसळल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोबाईल सेवा विस्कळीत असल्यामुळे अनेकांना आपल्या आप्तस्वकीयांशी संवाद साधणे कठीण झाल्याचे कपोते यांनी सांगितले.

दुपारी तीन वाजता दरड कोसळल्याचे समजल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ महामार्गावरील ढिगारा हटविण्याचे काम हाती घेतले आहे. शनिवारी सकाळी आठपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्‍वास अधिकारी व्यक्त करीत आहेत. मात्र, कोसळलेल्या कड्याचे गांभीर्य बघता दुपारी तीन वाजल्यानंतरच मार्ग खुला होईल, असे स्थानिक नागरिकांतर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच पर्यटकांच्या चिंता अधिक वाढल्या आहेत.