Mon, Jul 06, 2020 14:44होमपेज › National › 'एवढी केंद्रीय पथकं पाठवण्यापेक्षा अमित शहा स्वत: या बंगालमध्ये कामं करायला'!

'एवढी केंद्रीय पथकं पाठवण्यापेक्षा अमित शहा स्वत: या बंगालमध्ये कामं करायला'!

Last Updated: May 28 2020 10:16AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

एकीकडे जगभरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता केंद्र सरकार सर्व पातळीवर या विषाणूवर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी कोरोनावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगालमध्ये प्रवासी मजुरांच्या मदतीच्या बहाण्याने केंद्र सरकार आमच्या राज्याच्या कामात दखल देत असल्याचे ममता यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, सातत्याने केंद्रीय पथके प. बंगालमध्ये पाठवली जात आहेत. आमचे राज्य योग्य पध्दतीने कोरोनावर नियंत्रण आणू शकत नाही, असे अमित शहा यांना वाटत असेल, तर त्यांनी येथे स्वत: येऊन कामे करावी, असा खोचक निशाणा ममता यांनी शहा यांच्यावर साधला. 

बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. बुधवारी (दि.२७ मे) कोलकातामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ममता यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावरही राजकारण केल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी कोरोनाच्या लढाईमध्ये प्रवासी मजुरांच्या मदतीच्या बहाण्याने केंद्र सरकार आमच्या कामकाजात दखल देत असल्याचेही म्हटले आहे.  

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मी अमित शहा यांना म्हणाले की, 'आपण सातत्याने पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय पथके पाठवत आहात. आपण पाठवत राहा. परंतु, आपल्याला जर वाटत असेल की, राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य पध्दतीने काम करत नाही तर स्वत: या येथे कामे करायला, मला काहीच समस्या नाही.' ममता बॅनर्जी इथेच थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या की मी अमित शहा यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्याकडून जे उत्तर आले त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. ते म्हणाले होते-'नाही, नाही. आम्ही एक निवडून दिलेल्या सरकारला कसे नापसंत करू शकतो.'

वाचा - ४८ तासात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी आणि चक्रीवादळ ‘अम्फान’ने झालेल्या नुकसानीनंतर भाजपने तृणमूल काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. चक्रीवादळाने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ममता यांचे सरकार अपयशी ठरल्याचे भाजपने म्हटले. सात दिवसांनंतरदेखील राज्यातील लोक चिंतेत आहेत. येथे अद्यापही वीज आणि पाणी नाही. येथील लोकांना धान्य वाटपातही तथाकथित काळा बाजार केला आणि धान्य महाग किंमतीमध्ये विकले गेले, असेही भाजपने आरोप केले आहेत.