Mon, Nov 20, 2017 17:22होमपेज › National › उच्च न्यायालयाने दिली गांधीगिरी स्टाईल शिक्षा 

'एक आठवडा रोज राष्ट्रगीत म्हणण्याची शिक्षा' 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चेन्नई: पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेली शिक्षा ऐकूण तुम्हाला नक्कीच हिंदी चित्रपटातील गांधीगिरी आठवेल. राष्ट्रगीत सुरु असताना मोबाईलवर बोलल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने एका व्यक्तीस एक आठवडा राष्ट्रध्वज फडकावण्याची, ध्वजाला सलाम करण्याची आणि राष्ट्रगीत म्हणण्याची शिक्षा सुनावली आहे.   

तामिळनाडूमधील वेल्लूर शहरातील अम्बुल येथील सरकारी रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी १५ ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु असताना मोबाईलवर बोलत होते. 

१५ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात मुख्य वैद्यकीत अधिकारी ए.केनेडी राष्ट्रगीत सुरु असताना मोबाईलवर बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी सुरेश बाबू या व्यक्तीने अम्बुर शहर पोलिस ठाण्यात केनेडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 

राष्ट्रगीत सुरु असताना वैद्यकीय संचालकांचा महत्त्वाचा फोन आला होता. आपला राष्ट्रगीताचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे केनेडी यांनी न्यायालयात सांगितले. 

यावर न्यायालयाने केनेडी यांना अजब शिक्षा सुनावली. न्यायालयाने केनेडी यांना एक आठवडाभर रोज पोलिसांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकावण्याची, त्याला सलाम करण्याची आणि राष्ट्रगीत म्हणण्याची शिक्षा सुनावली.