Mon, Apr 22, 2019 01:44होमपेज › National › राजस्थानमध्ये मिग-२७ कोसळले, वैमानिक बचावला

राजस्थानमध्ये मिग-२७ कोसळले, वैमानिक बचावला

Published On: Feb 12 2019 7:52PM | Last Updated: Feb 12 2019 7:52PM
जैसलमेर (राजस्थान) : पुढारी ऑनलाईन

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात आज, मंगळवारी (दि.१२) सायंकाळी ६.१० वाजता भारतीय हवाई दलाचे मिग-२७ विमान कोसळले. मात्र, सुदैवाने या अपघातातून वैमानिक बचावला आहे, अशी माहिती हवाई दलाचे प्रवक्ते कर्नल सोंबित घोष यांनी दिली.

ही दुर्घटना जैसलमेर जिल्ह्यातील पोखरन तालुक्यातील इटा गावाजवळ घडली आहे. मिग-२७ विमानाने नियमित सरावासाठी जैसलमेर येथून उड्डाण केले होते. मात्र, ते काही वेळातच कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जैसलमेरचे पोलिस अधीक्षक किरन कंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमुळे कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पोलिस यंत्रणा हवाई दलातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले आहे.