Thu, Sep 19, 2019 03:29होमपेज › National › सीबीआयच्या नावाखाली भाजप प्रमाणे काँग्रेसही विरोधकांना धमकावते : अखिलेश यादव

सीबीआयच्या नावाखाली भाजप प्रमाणे काँग्रेसही विरोधकांना धमकावते : अखिलेश यादव

Published On: Apr 24 2019 7:43PM | Last Updated: Apr 24 2019 7:43PM
कानपूर : पुढारी ऑनलाईन

भाजप प्रमाणेच काँग्रेसही आपल्या विरोधकांना धमकावण्यातच धन्यता मानते, असा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बुधवारी कानपूर येथे आयोजित सभेत केला. काँग्रेसमध्ये अहंकार आहे तसेच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बाजूला केले आणि प्रतिस्पर्ध्यांनाही धमकावले आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी यावेळी केली.

समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या झालेल्या महाआघाडी पासून काँग्रेसला दूर ठेवल्यानंतर आज अखिलेश यादव यांनी काँग्रेसला झोडून काढले. काँग्रेसने माझे वडील तथा समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री मुलायसिंह यादव यांच्या विरोधात सीबीआयचा वापर केला होता असा आरोपही अखिलेश यांनी यावेळी केला. 

अखिलेश यादव हे पुढे म्हणाले, आमची काँग्रेस सोबत आघाडी होती. त्यावेळी आम्हाला काँग्रेसमध्ये खूपच अहंकार असल्याचे आढळून आले. २०१७ मध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी करुन विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण, सध्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीने काँग्रेला आपल्यापासून दूर ठेवले आहे. 

भाजपाला काँग्रेस नाहीतर महाआघाडी रोखेल

महाआघाडीने रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून उमेद्वार न देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला सोबत न घेण्याबाबत अखिलेश यादव म्हणाले, भाजपाला सत्तेत येण्यापासून काँग्रेस नाही तर  महाआघाडी रोखत आहे. काँग्रेसने माझे वडिल तथा समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री मुलायसिंह यादव यांच्या विरोधात सीबीआयचा वापर केला होता असा आरोप ही अखिलेश यांनी यावेळी केला.