Sun, Aug 25, 2019 01:30होमपेज › National › देशाच्या सरन्यायाधीशांविरोधातच 'कुटील डाव' ? : SC मुळाशी जाऊन पोलखोल करणार 

देशाच्या सरन्यायाधीशांविरोधातच 'कुटील डाव' ? : SC मुळाशी जाऊन पोलखोल करणार 

Published On: Apr 24 2019 6:28PM | Last Updated: Apr 24 2019 6:28PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक छळाच्या आरोपात गोवण्यासाठी मोठा कट शिजत असल्याचा आरोप झाल्यानंतर पुन्हा न्यायालयीन क्षेत्र हादरले आहे. वकील उत्सव बेन्स यांनी गंभीर खुलासा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी अत्यंत तीव्र भाषेमध्ये होत असलेल्या कटावर भाष्य करताना म्हणाले, लैगिंक प्रकरणात गोवण्यासाठी जो काही प्रकार केला जात आहे त्यावरून  कट करण्याचा असाच प्रकार होत राहिला आणि न्यायप्रक्रियेला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला, तर ही घटनात्मक सोडाच आपल्यामधीलही कोणी वाचणार नाही. 

सर्वोच्च न्यायालयाने वकील उत्सव बेन्स यांना आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. बेन्स यांनी अत्यंत गंभीर खुलासे केल्यानंतर त्यांना आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले. या प्रकरणात उद्या (ता.२५)  पुन्हा सुनावणी होणार आहे. 

दरम्यान, न्यायालयाने  बेन्स यांनी केलेल्या दाव्यांवर होत असलेली सुनावणी आणि लैंगिक छळाचे आरोप झाल्यानंतर होत असलेल्या अंतर्गत चौकशीचा काहीही  संबंध नसल्याचे सांगितले. बेन्स यांनी केलेल्या दाव्यांच्या मुळाशी जाऊन  सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे तीन सदस्यीय खंडपीठाने स्पष्ट केले. बेन्स यांनी प्रतिज्ञापत्रात केलेल्या अनेक गंभीर खुलाशानंतर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय संचालक, आयबी संचालक, दिल्ली पोलिस आयुक्तांना न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत सॉलिसिटर जनरलना सांगितले. 

प्रकरण नेमके काय?

सर्वोच्च न्यायालयची माजी कर्मचारी असलेल्या महिलेने तिची बाजू मांडण्यासाठी आपल्याला मोठ्या रकमेचे आमिष दाखवले होते. सरन्यायाधीशांविरोधात प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी आपल्याला १.५ कोटी रुपये देऊ केले होते, असा दावा या बेन्स यांनी केला होता.  

सरन्यायाधीश गोगोई यांनी माझ्यावर लैंगिक छळाचे आरोप करण्याच्या या प्रकरणात मोठा कट आहे व या आरोपांना उत्तर देऊ असे शनिवारच्या सुनावणीवेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर वकील बेन्स यांनी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात म्हटले आहे की, या प्रकरणी करण्यात आलेले आरोप ऐकून धक्का बसला व आपण सदर तक्रारदाराची बाजू मांडण्याची तयारी दर्शवली होती, पण जेव्हा अजय या व्यक्तीने सगळा घटनाक्रम सांगितला तेव्हा त्यात अनेक त्रुटी व विरोधाभास दिसून आले. 

नंतर तक्रारदाराचे दावे तपासून पाहण्यासाठी भेट घडवून आणण्याची विनंती केली असता तसे करण्यास नकार देण्यात  आला त्यातून संशय निर्माण होत गेला. सरन्यायाधीशांना अडकवण्यासाठी ५० लाखांचा देकार अजय याच्याकडून ठेवण्यात आला असताना तो फेटाळला पण नंतर त्याने १.५ कोटी रुपये देऊ केले. त्यावेळी अभिसाक्षी या नात्याने आपण त्याला कार्यालयातून चालते होण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणांच्या निकालांचे फिक्सिंग केले जाते. त्यासाठी पैसे घेतले जातात. हे रॅकेट सरन्यायाधीशांनी मोडून काढले होते त्यामुळे फिक्सर्सचा त्यांच्यावर राग आहे व त्यातूनच हे प्रकरण झाले आहे, असा दावा या वकिलांनी केला आहे.