Sun, Aug 25, 2019 02:31होमपेज › National › शेखर तिवारी यांच्या मृत्यू प्रकरणी पत्नी अपूर्व तिवारींना अटक

शेखर तिवारी मृत्यू : पत्नी अपूर्व तिवारींना अटक

Published On: Apr 24 2019 11:25AM | Last Updated: Apr 24 2019 12:08PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेश व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर तिवारी यांच्या मृत्यू प्रकरणी रोहितच्या पत्नी अपूर्व तिवारी यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे रोहित शेखर यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण लागले आहे. 

गेल्या १६ तारखेला रोहितचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवाल प्राप्‍त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले होते. गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी आज रोहितची पत्नी अपूर्वा हिची चौकशी करण्यात आली होती. 

रोहित आणि अपूर्वा यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र लग्‍नाच्या पहिल्या दिवसांपासून या दोघांमध्ये तणाव होता, अशी माहिती रोहितची आई उज्जवला यांनी पोलिसांना दिली होती.

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर याचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, रोहित शेखर याची तोंड दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालामधून उघड झाली होती. 

काय आहे प्रकरण?

रोहित शेखर मतदान करण्यासाठी कोटद्नारला गेला होता. त्यानंतर सोमवारी रात्री जवळपास अकरा वाजताच्या सुमारास डिफेन्स कॉलनीत असलेल्या त्याच्या घरी परतला. घरी आल्यानंतर जेवण केले आणि अर्ध्या तासानंतर झोपायला खोलीत गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित शेखर उशिरापर्यंत का झोपला आहे, हे पाहण्यासासाठी खोलीत चार वाजता नोकर गेल्या असता त्याच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आल्यानंतर नोकराने याबाबतची माहिती रोहित शेखरच्या आईला दिली. त्यानंतर त्याला येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेखर सोमवारी साडे अकरा वाजता झोपला होता. घरातील कोणीच ४.३० तासांपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याची पत्नी सुद्धा या घटनेवेळी घरात होती. याव्यतिरिक्त आणखी लोक घरी होते. पोलीस तपासातून समजते की, रोहित शेखर ज्यावेळी घरात आला होता, त्यावेळी तो नशेत होता. तसेच, झोप येत नाही म्हणून रोहित शेखर अनेकदा झोपेच्या गोळ्या घेत होता. त्यामुळे नशेत त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या असतील आणि त्याचे रिअॅक्शन असेल, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांना रोहित शेखरच्या खोलीत भरपूर औषधे आणि रिकामी रॅपर मिळाली होती.