Wed, Nov 14, 2018 12:15होमपेज › National › काश्मिरात चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मिरात चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Published On: Feb 13 2018 8:13PM | Last Updated: Feb 13 2018 8:13PMश्रीनगर : अनिल साक्षी

श्रीनगरच्या करणनगर भागात सीआरपीएफ मुख्यालयाच्या इमारतीजवळ लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा तब्बल 32 तासांच्या लढाईनंतर खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. सध्या सुरक्षा दलातर्फे शोधमोहीम सुरू आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) मुख्यालयावर सोमवारी सकाळी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांनी हल्‍ला केला होता. हा हल्‍ला रोखण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. मात्र, दोन्ही दहशतवादी जवळच्या इमारतीत दडून बसले होते.

मंगळवारी सकाळीच सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांविरुद्ध जोरदार अभियान सुरू केले. या दोघांनी अंदाधुंद गोळीबार केला. यादरम्यान सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली होती. अतिरिक्‍त सुरक्षा दल आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपने या मोहिमेत सहभाग घेतला. अखेर दुपारी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. 

जम्मूत हल्ल्याचा प्रयत्न 

दरम्यान, जम्मूतील एका लष्करी तळावरही हल्‍ला करण्याचा प्रयत्न दोन दहशतवाद्यांनी केला. मोटारसायकलवरून आलेले दोन दहशतवादी पहाटे साडेचारच्या सुमारास जम्मू-अखनूर मार्गावर असलेल्या दोमाना तळाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले होते. सुरक्षा रक्षकांनी सावध होऊन गोळीबार करताच हे दहशतवादी फरार झाले. त्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.