Sun, May 19, 2019 11:57
    ब्रेकिंग    होमपेज › National › त्या ‘ऑडिओ क्लिप’ची एसआयटीमार्फत चौकशी; कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा

त्या ‘ऑडिओ क्लिप’ची एसआयटीमार्फत चौकशी; कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा

Published On: Feb 11 2019 3:18PM | Last Updated: Feb 11 2019 3:18PM
बंगळूर : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकातील युतीचे सरकार पाडण्यासाठी जेडीएसच्या आमदाराला आमिष दाखविल्याच्या संभाषणाची ‘ऑडिओ क्लिप’ कर्नाटकचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ माजली आहे. आता या ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची सूचना कर्नाटक विधानसभेचे सभापती के. आऱ. रमेश कुमार यांनी सोमवारी (दि.११) राज्य सरकारला केली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी त्या ‘ऑडिओ क्लिप’ प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. मात्र, एसआयटी मार्फत चौकशीला भाजपने जोरदार विरोध दर्शविला आहे.  

कर्नाटकचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपवर कर्नाटक विधानसभेत तब्बल तीन तास चर्चा झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा आणि भाजप आमदार शिवनगौडा नाईक यांनी जेडीएसच्या आमदार पुत्राला आमिष दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

५० कोटी रुपये देऊन विधानसभा अध्यक्षांना बूक केले आहे. तसेच पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना बुक केले आहे. २५ कोटी रुपये तुम्हाला मिळतील असे आमिष जेडीएसच्या आमदाराला दाखविल्याच्या संभाषणाची ‘ऑडिओ क्लिप’ मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जाहीर केली होती.

हा मुद्दा काँग्रेसने उचलून धरत काँग्रेसने भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. आता या मुद्दा विधानसभेत पोहोचला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची सूचना विधानसभा सभापतींनी केली. एसआयटी स्थापन करून १५ दिवसांत अहवाल द्या, असे सभापती कुमार यांनी सांगितले. ''सभापतींवर आरोप झाल्याने मलाही दु:ख झाले. यामुळे सभापतींनी केलेली एसआयटी मार्फत चौकशीची सूचना आपण स्वीकारत आहे'', असे कुमारस्वामी यांनी नमूद केले. त्यानंतर भाजपचे आमदार जगदीश शेट्टर, गोविंद करजोल, जे.सी. मधूस्वामी आणि इतरांनी एसआयटी चौकशीला विरोध दर्शविला. सरकारकडून होणाऱ्या चौकशीसाठी आमचा विश्वास नाही, असे भाजप आमदारांनी सांगितले.

गुलबर्ग्यातील गुरुमिटकल येथील नागनगौडा कंदकूर यांना आमिष दाखविण्यात आले. आमदारपुत्र शंकरगौडा यांच्याशी येडियुराप्पांनी संवाद साधला. मुंबईत नाराज आमदार एकत्र आहेत. आणखी चार दिवसांत सरकार कोसळेल, त्यामुळे वडिलांना राजीनामा देण्यास सांग, असे येडियुराप्पांनी शंकरगौडा यांना सांगितले. याबाबतची सर्व माहिती ऑडिओमध्ये आहे. दरम्यान, कुमारस्वामी यांनी विधानसभा सभापतींकडे येडियुराप्पांविरूद्ध लेखी तक्रार केली होती.