विश्वनायक श्रीकृष्ण

Published On: Aug 24 2019 4:23PM | Last Updated: Aug 24 2019 4:41PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र

अभ्युदय रेळेकर


आज गोपाळकाला... कृष्ण जन्मानंतरचा पहिला दिवस... कृष्णाचा जन्म गोकुळात झाला नाही, तर तो लहानाचा मोठा गोकुळात झाला... तो वाढला आणि बहरला ते गोकुळातच.... म्हणूनच कृष्णाचा जन्म तुरुंगात देवकी आणि वसुदेवाच्या पोटी झाला असला तरी त्यांच्यापेक्षा मोठी आई-वडिलांची भूमिका गोकुळातील नंद राजा आणि यशोदेची आहे. म्हणूनच कृष्णाच्या जन्माला गोकुळ जोडले गेले ते त्यावेळेपासूनच. यामुळेच आपण कृष्णजन्माष्टमीला गोकुळाष्टमी म्हणतो.

 धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे-युगे असा उद्घोष करणाऱ्या कृष्णाने जगाला एक संस्कृती दिली, संस्कार दिले, जगण्याचा योग्य कर्ममार्ग कृष्णाने अखिल मानवजातीला दिला. तोच मार्ग खऱ्या अर्थाने सुखाचा मार्ग आहे. सुखाची सूत्रे आहेत. गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाने हे गीतेचे सुखसूत्र जगाला अर्पण केले.

आजच्या विज्ञान आणि माध्यमक्रांती तसेच जागतिकीकरण, अंतराळ विज्ञानाच्या युगात गीता खरंच लागू पडते का, असा प्रश्न तरुण-तरुणींना पडण्याची शक्यता आहे. सौंदर्य, संपत्ती, सत्ता, समृद्धी, ऐश्वर्य यांच्या मागे लागलेल्या तरुण पिढीला गीतेमधून काही खरंच घेण्याजोगं आहे का. तर नक्कीच आहे. भगवत गीतेमध्ये शब्दांशब्दांत किती मोठी शक्ती आहे किती मोठा गर्भितार्थ भरला आहे ते समजून घेतले तर आपल्याला विश्वरुप दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. भगवत गीतेच्या प्रार्थनेतील पहिल्या श्लोकाचाच अर्थ पाहिला तर आपल्याला त्या शक्तीचा प्रत्यय येईल.

 मूकं करोती वाचालं, पंगु लंघयते गिरिम्...
यत्कृपा तमहं वंदे, पमानंद माधवम्...

वरिल श्लोकाचा अर्थ सर्वसाधारणपणे आपण अनेकदा वाचला ऐकला असेल तो म्हणजे मुक्यालाही बोलायला लावणारा आणि पांगळ्यामध्येही पर्वत ओलांडण्याची शक्ती प्रदान करणारा परमानंद माधव श्रीकृष्ण तुझी कृपा माझ्यावर असू दे तुला वंदन...

पण या श्लोकाचा एक वेगळाच भव्यदिव्य अर्थ कुणी वाचला आहे का, बहूधा नसेल. जर संस्कृत भाषेचा विचार केला तर अत्यंत समृद्ध अशी ही भाषा आहे. या भाषेमध्ये एका शब्दाला अनेक पर्यायवाची शब्द आहेत. तसेच एकाच शब्दातून किंवा वाक्यरचनेतून अनेक अर्थबोध होऊ शकतात. अनेक गुह्य किंवा गुपिते या अर्थामध्ये दडलेली आपल्याला अनेक उदाहरणावरुन दिसून येतील. त्यातलेच एक गुपित गुह्य जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

मूकं करोती वाचालम्.... याचा अर्थ बोलक्या किंवा बडबड्याला मुके करणारा असाही होऊ शकतो, तसेच 
पंगुं लंघयते गिरीम्..... याचा अर्थ पांगळ्याला पार करणारा डोंगर असाही होतो.
..

म्हणजेच पंगू जाग्यावरच राहील आणि अख्खा डोंगर बाजूला होईल किंवा त्या पंगूला लांघेल असे होईल आणि भगवंताचे दर्शन होईल एवढी मोठी शक्ती श्रीकृष्णाच्या गीतेमध्ये आहे. नाही तर साधा पर्वत-डोंगर लांघण्यासाठी परमेश्वर कशाला पाहिजे... एवढे मोठे ज्ञान गीता तत्वज्ञानामध्ये आहे.

मूक आणि वाचाल या शब्दांची विभक्ती द्वितीया आहे. यत्कृपा हा करोति या क्रियापदाचा कर्ता आहे. त्यामुळे ज्याची कृपा मुक्याला बोलता करते हा जसा अर्थ होतो तसाच ज्याची कृपा बोलक्याला मुका करते असाही होतो.

एका श्लोकामध्ये जर एवढे मोठे सार भरले असेल तर संपूर्ण १८ अध्यायांची गीता जर पुन्हः पुन्हा वाचली तर त्यातून कितीतरी मोठा वेगवेगळा बोध होऊ शकतो. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपल्या ही एक गोष्ट जरी लक्षात आली तर कृष्णजन्माष्टमी साजरी केल्याचे सार्थक होईल.