Thu, Aug 22, 2019 14:37होमपेज › National › 'ममतांना ठरवून लक्ष्य केलं जात आहे, देशाच्या पंतप्रधानांना हे शोभत नाही'

'ममतांना ठरवून लक्ष्य केलं जात आहे, देशाच्या पंतप्रधानांना हे शोभत नाही'

Published On: May 16 2019 10:19AM | Last Updated: May 16 2019 10:19AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात न भुतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत प्रचार एक दिवस थांबविण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी निवडलेल्या टायमिंगवरून संशयकल्लोळ माजला आहे. आज (ता. १६) बंगालमधील प्रचार संध्याकाळी १० वाजता प्रचार थांबणार आहे.  या सर्व परिस्थितीवरून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मदतीला धावल्या आहेत. 

मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सडकून टीका केली. त्यांनी मोदी-शहा यांच्या राजकीय नीतीचे वाभाडे काढले.  त्या म्हणाल्या, ममता बॅनर्जी यांना  ठरवून लक्ष्य केले जात आहे, हे स्पष्ट आहे. आणि हे खूप भयानक आहे. अशा पद्धतीाच ट्रेंड देशाच्या पंतप्रधानांना  शोभत नाही. 

निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपणावरही त्यांनी आसूड ओढले. त्या पुढे म्हणाल्या,  आयोगाने बंगालमध्ये एक दिवस अगोदर प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्यासाठी रात्री १० ची वेळ निवडली आहे, कारण पीएम मोदींच्या आज बंगालमध्ये दोन सभा आहेत. जर त्यांना प्रचारबंदी करायचीच होती, तर आज सकाळपासूनच का केली नाही? हा सर्व प्रकार दुर्दैवी असून आयोग दबावाखाली काम करत आहे.