Fri, Nov 24, 2017 20:01होमपेज › National › कांदा उत्पादकांना आता पाकिस्तानचा आधार 

पाकिस्तानात कांद्याने गाठली 'शंभरी'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

येवला : अविनाश पाटील 
अवघ्या पंधरवड्यातच कांद्याचे दर ४० ते ५० टक्के घसरल्याने हवालदील झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीच्या भावासाठी पाकिस्तानवर भिस्त ठेवावी लागणार आहे. पाकिस्तानात कराचीच्या बाजारात कांदा १०० रुपये किलो दराने विकला जात असल्याने पाकिस्तान सरकारने भारताकडे कांद्याच्या पुरवठ्याची मागणी केली आहे. त्याचा विचार करून जर केंद्र सरकारने पाकिस्तानला कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली तर, कांद्याचे दर निश्चितच काही प्रमाणात पुन्हा वाढतील, असे मत कांदा व्यापारी व्यक्त करत आहे.


कांद्याबद्दल शासनाच्या आयात-निर्यात धोरणावरील धरसोडीच्या धोरणामुळे तसेच उत्तरपूर्वेकडील राज्यातील पुरपरिस्थिती त्यात नेपाळकडून आलेल्या पुरपाण्यामुळे कांद्याची मागणी कमी झाली. याचा परिणाम म्हणून अवघ्या पंधरवड्यातच कांद्याचे दर क्विंटलमागे एक हजार रुपयांहून अधिक कोसळले. पंधरा दिवसांपूर्वी दोन हजार ५००च्या वर जाणारा कांदा आता अवघ्या १ हजार ४०० ते १ हजार ५०० च्या आत विकला जात आहे. कांदा आयातीचा निर्णय व व्यापाऱ्यांकडील साठवलेला कांद्याबाबत चौकशी झाल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचे मत शेतकऱ्यांसह या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत असले तरी, आता पाकिस्तानने मागणी केलेला कांदा जर दिला तर या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पाकिस्तानमध्ये स्थानिक बाजारात कांद्याची आवक थंडावली असून, त्यांच्याकडील बलुचिस्तानमधील कांदा साठाही संपलेला आहे. सिंध प्रांतातील कांदा ऑक्टोबरच्या मध्यावर बाजारात येऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कांद्याची मागणी प्रचंड वाढली आहे. स्थानिक तुटवड्यामुळे कराचीमध्ये कांद्याचे दर प्रति किलो शंभराच्यावर गेले असल्याने वाढेलेल्या दराला आळा घालण्यासाठी भारतातून ५० हजार टन कांदा आयात करण्याची मागणी होत आहे. पाकिस्तान सरकारकडून कांद्याची पूर्वेकडील देशासह श्रीलंकेकडील निर्यात बंद केली असून, पाकिस्तानच्या तुलनेत भारत, चीन व इजिप्तमधील कांद्याचे दर कमी असल्याने तेथून कांदा आयात करीत पाकिस्तानची गरज दीड महिन्यासाठी भागवण्याचे नियोजन पाकिस्तान सरकारकडून सुरु आहे. भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तानला भारातातील कांदा आयात करणे परवडणारे असून तसे झाल्यास भारतीय कांद्याला चांगले बाजार मिळतील. तसेच पाकिस्तानमधील या परिस्थितीचा फायदा घेऊन भारताला कांदा निर्यातीला प्रोत्सहन देऊन बाहेरील देशात कांदा निर्यात वाढवीत परकीय चलनही मिळू शकते. त्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.