शेहला रशीद ट्विटवर ट्विट करून गोत्यात

Published On: Aug 19 2019 1:16PM | Last Updated: Aug 19 2019 1:16PM
Responsive image


श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्मू-काश्‍मीरबाबतचे कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीर पिपल्स मुव्हमेंटची पक्षाच्या नेत्या आणि जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशीद हिने रविवारी (दि.18) काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचा दावा करत एकामागोमाग दहा ट्विट केले. काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून सामान्य लोकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप तिने केला. या प्रकरणी तिच्यावर सुप्रीम कोर्टात वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी याचिका दाखल करत शेहला यांच्या अटकेची मागणी केली आहे.

भारतीय लष्कराने शेहलाचे आरोप फेटाळले आहेत, शेहलाने केलेले आरोप हे तथ्यहीन आहेत. तिने केलेल्या आरोप खोटे आहेत. अशांतता आणि हिंसा भडकविण्यासाठी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या विरोधकांकडून पसरवल्या जात असल्याचे भारतीय लष्काराने म्हटले आहे. 

जम्मू-काश्‍मीरबाबतचे कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरमध्ये सुखकर वातावरण निर्माण होत असल्याचे वृत्त येत असतानाच शेहला रशीद यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध करत करत एकामागोमाग दहा ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये लष्कराचे जवान रात्री नागरिकांच्या घरात घुसून तरुणांना उचलून घेऊन जात आहेत, घरांमध्ये तोडफोड केली जात आहे. केवळ लष्कराचा मनमानी कारभार सुरू आहे. एका एसएचओ दर्जाच्या अधिकाऱ्याची केवळ सीआरपीएफच्या जवानाने तक्रार केली म्हणून बदली करण्यात आली. 

तसेच, शोपियांच्या लष्करी तळामध्ये चार जणांना घेऊन गेले आणि त्यांना चौकशीच्या नावाखाली टॉर्चर करण्यात आले. त्यांच्याजवळ एक माइक ठेवण्यात आला, जेणेकरुन सर्व परिसरात त्यांचा आवाज ऐकायला जाव्यात आणि दहशत पसरावी, परिणामी सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. अशाप्रकारचे अनेक गंभीर आरोप शेहला रशीदने केले आहेत.