Sat, Jul 11, 2020 23:24होमपेज › National › काल इटलीला, आज स्पेनला मागे टाकले; भारतात कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ सुरुच!

काल इटलीला, आज स्पेनला मागे टाकले; भारतात कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ सुरुच!

Last Updated: Jun 07 2020 11:03AM
 नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव थांबायचे काही नाव घेईनासा झाला आहे. उलट देशात दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होऊन मोठा गुणाकार होत चालला आहे. गेल्या २४ तासात देशात ९ हजार ९७१ नव्या  कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर २८७ जणांचा बळी गेला आहे. ही सुद्धा विक्रमी वाढ आहे. भारत आता कोरोनाबाधितांच्या देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताने काल इटलीला, तर आज स्पेनला मागे टाकले आहे.  

अधिक वाचा: रक्तबंबाळ, भुकेने व्याकुळ होऊन चालत घरी गेलेल्या मजुरांसाठी आता 'पायघड्या'

देशात गेल्या आठवड्यापासून नऊ हजारांच्या आसपास रूग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २ लाख ४६ हजार ६२८ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १ लाख २० हजार ४०६ रुग्ण आहेत. उपचारानंतर बरे झालेले  १ लाख १९ हजार २९३ जण आहेत.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६ हजार ९२९ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

अधिक वाचा: चिनी वस्तूंचा पैसा त्यांच्या लष्कराला जात असल्याने चिनी मालावर बहिष्कार घाला!

जगात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगात आतापर्यंत ६९ लाख ७३ हजार २४७ जणांना कोरोना व्हायरसने ग्रासले आहे. २१३ देशात कोरोना या महामारीने चार लाख दोन हजार ६९ जणांचे बळी घेतले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३४ लाख ११ हजार ९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.