Thu, Jul 02, 2020 20:16होमपेज › National › अतिदुर्गम ठिकाणी कोसळलेल्या 'त्या' विमानातील १३ जणांपैकी कोणीही वाचले नाही!

अतिदुर्गम ठिकाणी कोसळलेल्या 'त्या' विमानातील १३ जणांपैकी कोणीही वाचले नाही!

Published On: Jun 13 2019 1:27PM | Last Updated: Jun 13 2019 2:48PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

आसाममधून ३ जून रोजी बेपत्ता झालेल्‍या हवाई दलाच्या एएन ३२ या विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशमधील सियांगमध्‍ये  सापडले. या विमानात १३ जण होते. ज्या दुर्गम ठिकाणी हे विमान कोसळले; त्या ठिकाणी भारतीय हवाई दलाचे ८ जणांचे बचावपथक आज सकाळी पोहोचले. मात्र, घटनास्थळी विमानातील १३ जणांपैकी कोणीही वाचले नसल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

शोध पथकाला एअरलिफ्ट करून घटनास्थळी पोहोचण्यात आले होते. ज्या ठिकाणी दुर्घटना झाली तो भाग खूप उंचीवर आणि घनदाट जंगलात आहे. तेथे पोहोचण्यासाठी बचावपथकाला अनेक अडचणी आल्या. तरीही तेथे बचावपथक पोहोचले. तेथे विमानाचे अवशेष मिळाले पण कोणीही वाचलेले नाही.   

भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे विमान ३ जून रोजी आसाममध्ये चीनच्या हद्दीलगत बेपत्ता झाले होते. या विमानात ६ अधिकारी आणि ७ एअरमॅन होते. हे विमान आसामातील जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशात जात होते. अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथील तळावर ते दुपारी दीड वाजता पोहोचणे अपेक्षित होते. दुपारी १२.२५ वाजता या विमानाने उड्डाण केले आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा त्याच्याशी दुपारी १ वाजता शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला. 

या विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लावल्या होत्‍या. या विमानाचे अवशेष सापडले. मात्र, या विमानातील कोणीही वाचलेले नाही.
या दुर्घटनेत विंग कमांडर जीएम चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर थापा, प्लाइट लेफ्टनंट ए तंवर, प्लाइट लेफ्टनंट एस. मोहंती, प्लाइट लेफ्टनंट एम. के. गर्ग,  वॉरंट ऑफिसर के. के. मिश्रा, सार्जेंट अनूप कुमार, कोरपोरल शेरिन, लीड एअरक्राफ्ट मॅन एस. के. सिंह, ली़ड एअरक्राफ्ट मॅन पंकज, गैर लढाऊ कर्मचारी पुतली, राजेश कुमार हे शहीद झाले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.

एएन ३२ च्या दुर्घटनेत ज्या आमच्या शूर हवाईवीरांचे प्राण गेले; त्यांना आमची श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियाबरोबर आहोत, असे भारतीय हवाई दलाने ट्विटरद्वारे म्हटले आहे.

रहस्यमय असा पूर्ण अरुणाचल प्रदेशचा पहाडी भाग... 

ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या ठिकाणी जाण्यासाठी हवाई दलाच्या पथकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पूर्ण अरुणाचल प्रदेशचा पहाडी भाग रहस्यमय मानला जातो. याआधी येथे दुसऱ्या महायुद्धावेळी बेपत्ता झालेल्या विमानांचे अवशेष मिळाले होते. आता ज्या ठिकाणी हवाई दलाच्या विमानाचे अवशेष मिळाले आहेत. हा भाग १२ हजार फूट उंचीवर आहे.