Wed, Nov 14, 2018 12:38होमपेज › National › आईच्या मृत्यूनंतरही तिच्या कुशीत गाढ झोपला

आईच्या मृत्यूनंतरही तिच्या कुशीत गाढ झोपला

Published On: Feb 13 2018 5:52PM | Last Updated: Feb 13 2018 5:51PMहैदराबाद : पुढारी ऑनलाईन

आईच्या मातृत्वाविषयी साहित्यात बरेच लिखाण झाले आहे. तरीही आपण आईची माया शब्दांत वर्णन करू शकत नाही. हैदराबाद मधील एका रुग्णालयात अशीच एका मुलाबाबत ह्रदयद्रावक  घटना घडली. 

एखादा मुलगा दिवसभर खेळून झाल्यावर आईच्या कुशीत झोपतो. गाढ झोप ही आईच्या कुशीतच लागते. ओस्मानिया रुग्णालयात एक साधारण ५ वर्षाचा मुलगा आपल्या आईला घेऊन आला. तो ज्यावेळी त्याच्या आईला रुग्णालयात घेऊन आला होता. त्यावेळी त्या आईची अवस्था फारच गंभीर होती. डॉक्टरांनी त्याच्या आईला हार्ट अॅटॅक आल्याचे ओळखले आणि त्यांनी उपचार सुरु केले. पण, डॉक्टर त्याच्या आईल वाचवू शकले नाहीत. त्या मातेबरोबर फक्त ५ वर्षांचा तो मुलगाच असल्याने डॉक्टरांनाही कळेना की ही घटना कशी सांगावी. मग त्यांनी रुग्णालयात मदतीसाठी असलेल्या समाजसेवी संस्थेच्या प्रतिनिधींची मदत घेतली. त्या मुलाने सोबत आईचे आधार कार्ड आणले होते. त्यावरुन त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, आपल्या आईचा मृत्यू झाला आहे याची कल्पना त्या ५ वर्षांच्या मुलाला नव्हती. तो मुलगा या धावपळीने दमला होता. त्या मुलाने एवढ्या मोठ्या रुग्णालयात आपल्या आईची कुशी शोधली, जी आता निर्जीव झाली होती. तो त्या कुशीत झोपून गेला. हे सर्व तेथील डॉक्टर बघत होते. पण, कोणालाही त्या मुलाला त्याची आईच्या कुशीत झोपण्याची ही त्याची शेवटची संधी आहे, असे सांगण्याचे धाडस झाले नाही म्हणून कोणी त्याची ही शेवटची संधी हिरावून घेतली नाही. 

त्या मातेच्या कुटुंबाचा शोध घेणाऱ्या समाजसेवी संस्थेचे प्रतिनिधींना त्यांच्या कुटुंबाची माहिती मिळाली. त्याच्या आईचे नाव समीना सुल्ताना होते. ती बांधकामावर मजुरीचे काम करत होती. तिच्या पतीने तिला ३ वर्षांपूर्वी सोडून दिले होते. ती सध्या राजेंद्रनगरमध्ये रहात होती. त्या मुलाचे एकमेव मायेचे माणूसही काळाने हिरावून घेतल्याने रुग्णालयातील प्रत्येकजण हळहळत होता.