गांधीनगर : पुढारी ऑनलाईन
पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने उपोषण सोडले आहे. गेल्या १९ दिवसांपासून त्याचे उपोषण सुरू होते. पाटीदार समाजातील दोन सामाजिक आणि धार्मिक नेत्यांकडून पाणी घेऊन हार्दिकने उपोषणाचा शेवट केला. अखेरच्या क्षणापर्यंत उपोषण करण्याचा निर्णय हार्दीकने घेतला होता.
हार्दिकने पाटीदार समाजातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, समाजातील युवकांना नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण मिळावे यासाठी हार्दिकने उपोषणाचा मार्ग पकडला होता. त्याचबरोबर पाटीदार समितीचे समन्वयक अल्पेश क्षत्रिय यांची सुटका करण्यात यावी ही मागणी सुद्धा उपोषणा दरम्यान करण्यात आली होती.
हार्दिकच्या उपोषण कालावधीमध्ये अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी भेटी दिल्या. यामध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश आंबेडकर, भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत, आमदार जिग्नेश मेवाणी आदींचा त्यामध्ये समावेश होता.