Sat, Jul 04, 2020 14:34होमपेज › National › प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकराची अनोखी शक्‍कल, पण... 

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकराची अनोखी शक्‍कल 

Last Updated: May 27 2020 3:57PM
वलसाड (गुजरात) : पुढारी ऑनलाईन 

प्रेम हे आंधळे असते असे म्‍हणतात. मग अशा अंधळ्या प्रेमातूनच अनेक गोष्‍टीही घडत असतात. अशीच एक घटना गुजरातच्या वलसाडमध्ये घडली. त्‍याचे झाले असे की, कोरोनाचा फैलाव होऊ नये म्‍हणून देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. यामुळे अनेक लोक आहे त्‍याच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्‍यातच गुजरातमधील एक युवक आपल्‍या प्रेयसीला भेटण्यासाठी व्याकुळ झाला होता. या व्याकुळतेतूनच या प्रियकराने मुलीचा गेटअप करून प्रेयसीला भेटण्याचा निष्‍यच केला. त्‍याप्रमाणे तो एखाद्या मुलीप्रमाणे ड्रेसअप करून बाहेर पडला. मात्र त्‍याची ही बनवेगिरी बाहेर आली, आणि त्‍याला पकडण्यात आले.  

हा प्रकार परडी कसब्‍यात घडला. या १९ वर्षीय युवकाने सांगितले की, मला वाटले पोलिस महिला आणि मुलींना बाहेर पडल्‍यावर जास्‍त चौकशी करत नाहीत. त्‍यामुळे त्‍यालाही आरामात बाहेर पडता येईल. या विचारानेच त्‍याने मुलीच्या गेटअपमध्ये बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा प्रेमी आपल्‍या प्रेयसीला भेटण्यासाठी इतका आतूर होता की, तो रात्री २ वाजून ४० मिनिटांच्या दरम्‍यान तयार होऊन घरातून बाहेर पडला. 

रात्रीच्या बंदोबस्‍ताला असलेल्‍या पोलिसांना रात्री एक मुलगी पंजाबी ड्रेस परिधान करून स्‍कुटीवरून चालल्‍याचे पाहिले. इतक्‍या रात्री एक युवती स्‍कुटीवरून तोंडाला बांधून चालल्‍याची बाब पोलिसांना खटकली. त्‍यामुळे पोलिसांनी भोसलापाडा-परिया रस्‍त्‍यावर या मुलीला रोखले, आणि इतक्‍या रात्री रस्‍त्‍यावरून कुठे फिरत आहात अशी चौकशी केली. त्‍यावर मुलीच्या पेहरावातील या युवकाने आपले बिंग फुटेल या भितीने मान खाली घातली. त्‍याने पोलिसांच्या कुठल्‍याच प्रश्नाला उत्‍तर देणे टाळायला सुरूवात केली. या प्रकारामुळे पोलिसांना या युवतीबद्दलचा संशय आणखीनच गडद झाला.  

वारंवार विचारूनही काहीच उत्‍तर मिळत नसल्‍याने अखेर पोलिसांनी युवकाच्या चेहऱ्यावरील बांधलेला दुपट्टा उघडला. यावेळी मुलीच्या गेटअपमधील दुपट्यामागे युवकाचा चेहरा पाहून काहीवेळ पोलिसही अवाक झाले. 

पोलिसांनी सांगितले की, युवकाने चेहऱ्यावर दुपट्यासोबतचं मास्‍कही लावला होता. त्‍याने एखाद्या मुलीप्रमाणे पूर्ण पंजाबी ड्रेस घातला होता. तसेच तोंडाला दुपट्टा बांधल्‍याने त्‍याला ओळखने सुरूवातील कठीणच होते. जर पोलिसांनी त्‍याचा चेहरा खोलला नसता, तर त्‍याला पकडणे शक्‍य नव्हते. यावेळी युवकाने आपण आपल्‍या प्रेयसीला भेटण्यासाठी हे सर्व केल्‍याचे कबुली दिली. 

पोलिसांनी सांगितले की, हा युवक मोतीवाड फाटक परिसरातील राहणारा आहे. त्‍याच्याविरूध्द अनेक कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. त्‍याला कोर्टात हजर करण्यात आले असता, त्‍याला जामीनावर सोडण्यात आले.