एअर इंडिया, भारत पेट्रोलिअमची विक्री कणार : सितारामन

Last Updated: Nov 17 2019 3:31PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार असून या कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्यामुळे हे पाऊल उचलेले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीतून सरकारला एक लाख कोटींचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना त्यांनी ही माहिती दिली. 

याच महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना खुले पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, कंपनीचे विभाजन कंपनीला अधिक सक्षम बनवेल. गेल्या वर्षी सरकारने विमान कंपनीतून ७६ टक्के हिस्सा विक्रीसाठी काढला होता. मात्र, कोणीही कंपनी विकत घ्यायला तयार नव्हते. सध्या सरकारकडे एअर इंडियाचे १०० टक्के समभाग आहेत.

अर्थमंत्री सितारामन यांनी आर्थिक मंदीबाबत भाष्य करत आर्थिक मंदीचे मळभ दूर करण्यासाठी वेळेवर आवश्यक पावले उचलण्यात आल्याचे म्हटले. सितारामन म्हणाल्या की, या आर्थिक वर्षात करसंकलनात झालेली घट पाहून निर्गुंतवणूक आणि धोरणात्मक विक्रीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याचा सरकारचा विचार आहे. एअर इंडियाची खरेदी करण्यास गुंतवणुकदारांमध्ये उत्साह आहे. गेल्या वर्षी गुंतवणुकदारांनी एअर इंडिया कंपनी खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. त्यामुळं कंपनी विकली गेली नव्हती. 

त्या म्हणाल्या, अनेक क्षेत्र या मंदीतून सावरत आहेत. आपलं ताळेबंद सुधारा असं अनेक उद्योगांच्या मालकांना सांगण्यात आलं असून, त्यातील अनेकांनी नवी गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे, असंही त्या म्हणाल्या.

भारत पेट्रोलिअम कॉर्पोरशन लिमिटेडने (बीपीसीएल) सचिवांच्या एका गटाने ऑक्टोबरमध्ये सरकारची पूर्ण ५३.२९ टक्के हिस्सा विक्रीसाठी सहमती व्यक्त केली होती. बीपीसीएलचा बाजार भांडवल सुमारे १.०२ लाख कोटी रुपये आहे. याची ५३ टक्के हिश्याच्या विक्रीसह ६५,००० कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध होईल अशी सरकारला आशा आहे.