Thu, Mar 21, 2019 09:05होमपेज › National › ‘आधार’ची कमाल; सरकारचे ९० हजार कोटी वाचले!

‘आधार’ची कमाल; ९० हजार कोटी वाचले!

Published On: Jul 12 2018 12:44PM | Last Updated: Jul 12 2018 12:44PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आधार कार्डच्या माध्यमातून बँकांमध्ये अनुदान जमा करण्याच्या सुविधेमुळे सरकारने ९० हजार कोटी रुपये वाचले आहेत. याबाबतची माहिती युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) चे चेअरमन जे. सत्यनारायन यांनी बुधवारी झालेल्या एका आंतरराष्ट्रीय संमेलनात दिली. भारताने ‘आधार’चा वापर केल्यामुळे ९० हजार कोटींची बचत केल्याचा दावा त्यांनी केला. ‘डिजिटल ओळख’ विषयावर एका संमेलनात त्यांनी आधारकार्डच्या वापराने झालेल्या फायद्यांबाबतची माहिती दिली.

भारतात दररोज सरासरी ३ कोटी लोक आधार कार्डचा वापर करतात. यामध्ये प्रामुख्याने स्वस्त धान्य, निवृत्ती वेतन, ग्रामीण रोजगार यासह विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सर्वाधिक वापर होत असल्याचे जे. सत्यनारायण यांनी सांगितले.  इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद येथे झालेल्या तीन दिवसीय संमेलनात ‘आधार’वर विशेष लक्ष देण्यात आले. सत्यनारायण म्हणाले की, पेट्रोलयिम आणि घरगुती गॅस, अन्न-धान्य वितरण, ग्रामीण विकास यांसह इतर विभागांमध्ये मिळून ९० हजार कोटी रुपये वाचले. सरकार नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगती करत आहे.

काही क्षेत्रांमध्ये अजुनही संशोधनाची गरज असल्याचे जे. सत्यनारायण यांनी  सांगितले. आधारच्या बाबतीत अद्ययावत बायोमेट्रिक तंत्रज्ञान, आधार इको तंत्रज्ञान, नामांकन आणि त्याच्या अपडेट आणि प्रमाणीकरणासाठी योग्य पद्धतींचा वापर करण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी नव्या तंत्रज्ञानाचा किंवा नेटवर्कचा अभाव आहे अशा ठिकाणी आधार प्रणाली कार्यन्वित करुन देणे आणि त्यामध्ये गैरव्यवहार होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी आर्टीफिशियअ इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंगचा वापर करण्यासाठी संशोधन करण्याची गरज पडेल असेही जे. सत्यनारायण यांनी सांगितले.

संमेलनाचा उद्देश इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये ‘डिजिटल आयडेंटिटी रिसर्च इनिशिएटिव्ह’ (DIRI) कडून करण्यात आलेल्या संशोधनाचे प्रदर्शन करणे हा आहे. यामध्ये ‘आधार’साठी नव्या तंत्रज्ञानाचा फायदा आणि नुकसान याबद्दल मिळणाऱ्या माहीतीवर DIRIचे संशोधन अवलंबून आहे.