Sun, Feb 23, 2020 04:31होमपेज › National › माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

Published On: Aug 25 2019 1:44AM | Last Updated: Aug 25 2019 1:44AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक, निष्णात कायदेपंडित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीचे ‘चाणक्य’ आणि तरीही सर्वच पक्षांमध्ये मोठा मित्रपरिवार सांभाळणारे अजातशत्रू अरुण जेटली (66) यांचे शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. अनेक दिवसांपासून दुर्धर आजारांशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली आणि भाजपचा फार मोठा आधारस्तंभ अकस्मात निखळून पडला. जेटली यांच्या अकाली निधनाने मोदी सरकारसह भाजप परिवाराला मोठा धक्का बसला आहे. 

जेटली यांना 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात जीवरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. अँजिओक्रोनोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट आणि नेफ्रॉलॉजिस्टचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
दोन वर्षांपासून आजारी

अरुण जेटली गेल्या दोन वर्षांपासून सतत आजारी होते. त्यांच्यावर 2018 साली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये कर्करोगाचेही निदान झाले होते, त्यावर त्यांनी अमेरिकेत उपचार घेतले होते. उपचारासाठी न्यूयॉर्कला जावे लागल्याने मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प त्यांना मांडता आला नव्हता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्याकडील अर्थखात्याचा कार्यभार पीयूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला होता. अंतरिम अर्थसंकल्पही गोयल यांनीच सादर केला होता. आजारपणामुळे मोदी-2 सरकारमध्ये ते सामील झाले नव्हते.

अरुण जेटली यांच्या रूपाने भारतीय अर्थकारणात एक नवा अरुणोदय झाला होता. जेटली यांनी अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. मजबूत अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत त्यांच्याच कार्यकाळात भारताला जगात पाचवा क्रमांक प्राप्त झाला होता.

भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जेटली यांनी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांनी कायदा आणि जलवाहतूक मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. 2000 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. 2009 मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी कामही पाहिले होते. विद्यार्थिदशेपासूनच ते राजकारणात सक्रिय होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या.

अर्थव्यवस्थेला मजबुती दिली : मुख्यमंत्री
जेटली यांच्या निधनाने मी अतिशय व्यथित झालो आहे. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. या कालावधीत अत्यंत क्रांतिकारी अशा निर्णयांनी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती दिली होती. जीएसटीच्या अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

जेटली राष्ट्राचे अनमोल रत्न
 अरुण जेटली देशातील एक द्रष्टे मुत्सद्दी, कायदेतज्ज्ञ, प्रतिभासंपन्न संसदपटू तसेच उत्कृष्ट केंद्रीय मंत्री होते.अमोघ वक्तृत्व लाभलेले जेटली राष्ट्राकरिता अनमोल रत्न होते. केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट, वाणिज्य, उद्योग यांसह इतर अनेक मंत्रालयांचा कारभार सांभाळताना जेटली यांनी आपल्या कामकाजाचे मापदंड निर्माण केले.  
    सी. विद्यासागर राव, राज्यपाल

पक्षाचे सर्वात मोठे नुकसान
अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांची कामगिरी खूपच प्रभावी ठरली. देशाच्या मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम त्यांनी केले. 
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

आज अंत्यसंस्कार
जेटली यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांत्वनेसाठी जेटली यांच्या पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांना फोन केला तेव्हा त्यांनी विदेश दौर्‍यावरून अंत्यसंस्कारासाठी परतून येऊ नये. देशाची सेवा अधिक महत्त्वाची आहे. तुम्ही परतल्यावर आपण भेटूच, अशा भावना कळवल्या आहेत. 

जेटलींचे निधन चटका लावणारे
अरुण जेटली हे भारतीय राजकारणातील मातब्बर नेते होते. त्यांच्या प्रतिभेला, बुद्धिमत्तेला तोड नव्हती. ते बोलत तेव्हा सगळेच डोलत असत. ते उत्तम वक्ते होते. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी दूरद़ृष्टीने धोरणे आखली. नव्या भारताच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक होते. त्यांचे निधन चटका लावून जाणारे आहे. मी त्यांच्या पत्नी आणि मुलाशी फोनवरून बोललो. माझ्या भावना, सांत्वना त्यांना कळवल्या. समर्पित नेतृत्वाला माझी श्रद्धांजली! ओम शांती!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी  

माझे दु:ख शब्दातित
अरुण जेटली यांच्या निधनाने मला झालेले दु:ख शब्दातित आहे. त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक आणि कधीही भरून न निघणारी हानी आहे. त्यांच्या रूपाने मी संघटनेतील वरिष्ठ आणि अत्यंत क्लिष्ट विषयांतही सुलभ मार्ग शोधून काढणार्‍या मार्गदर्शकाला मुकलेलो आहे. मला एक सहकारी मार्गदर्शक म्हणून त्यांचा वर्षानुवर्षे सहवास लाभला, हे मी माझे भाग्य मानतो.
- अमित शहा, गृहमंत्री

जेटली यांच्या निधनाने दुःख
अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. मी त्यांना काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करतो.
- राहुल गांधी, काँग्रेस