उत्तराखंडमध्ये ढगफुटीने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू

Published On: Aug 19 2019 9:43AM | Last Updated: Aug 19 2019 10:43AM
Responsive image
कुल्लू येथे मुसळधार पावसाने निर्माण झालेली पूरस्थिती.


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पूर आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार उडाला आहे. तर हिमाचल प्रदेशात ७० वर्षातील सर्वात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील मोरी तालुक्यात ढगफुटीने १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचलमध्ये मनाली आणि कुल्लू दरम्यानच्या महामार्गाचे मोठे नुकसान झाले आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशीत ढगफुटी झाली आहे. दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सुमारे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता आहेत.
उत्तराखंडमधील आठ जिल्हे मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले आहेत. येथील मोरी भागातील आराकोट येथे जोरदार पाऊस आणि ढगफुटी झाली आहे. यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखांनी दिली आहे. येथे बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर पाठविण्यात आली आहेत. तसेच एसडीआरएफची पथके बचावकार्य करत आहेत.   

विशेषतः पावसामुळे उत्तरकाशी, लामबगड, बागेश्वर, चमोली आणि टिहरी येथील परिस्थिती गंभीर बनली आहे. येथील शाळा महाविद्यालये बंद आहेत. आतापर्यंत १७० लोकांना वन विश्राम गृहात हलविण्यात आले. येथे आज, सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

या राज्यातील पावसाचा परिणाम राजधानी दिल्लीवर होण्याची शक्यता आहे. यमुना नदीची पातळी वाढल्याने हरियाणातील हथिनीकूंड बैराजमधून ८.७२ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.