Thu, Mar 21, 2019 00:54होमपेज › National › स्वामी असिमानंदसह पाच आरोपी दोषमुक्‍त

स्वामी असिमानंदसह पाच आरोपी दोषमुक्‍त

Published On: Apr 16 2018 10:14PM | Last Updated: Apr 16 2018 8:57PMहैदराबाद : वृत्तसंस्था

हैदराबादमधील मक्‍का मशिदीतील बॉम्बस्फोटाप्रकरणी दहशतवादविरोधी  न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने स्वामी असिमानंदसह पाचही आरोपींना 11 वर्षांनंतर दोषमुक्‍त केले आहे. प्रारंभी सीबीआयकडे असलेला या प्रकरणाचा तपास नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) होता.

मक्‍का मशिदीत 18 मे 2007 रोजी नमाज सुरू असताना बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर 58 जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर आंदोलन करणार्‍या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. यात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण 160 साक्षीदार होते.

बॉम्बस्फोटांमध्ये 10 आरोपी होते. हे सर्व जण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहेत. स्वामी असिमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा ऊर्फ अजय तिवारी, भरत मोहनलाल रतेश्‍वर, राजेंद्र चौधरी व अन्य पाच जण या प्रकरणात आरोपी होते. तपास यंत्रणांनी स्वामी असिमानंदसह पाच जणांना अटक केली होती. यातील स्वामी असिमानंद व भरत भाई या दोघांची जामिनावर सुटका झाली होती. तर उर्वरित तीन आरोपी हैदराबादमधील कारागृहात आहेत. आरोपी रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे दोघे अजूनही फरार आहेत. आणखी एक आरोपी सुनील जोशीचा गोळीबारात मृत्यू झाला होता. तसेच तेजराम परमार आणि अमित चौहान या दोघांविरोधात अजूनही तपास सुरू आहे.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. 68 प्रत्यक्षदर्शींचा जबाब सीबीआयने नोंदवला होता. यातील 54 साक्षीदारांनी जबाब फिरवला आहे. सीबीआयने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर एप्रिल 2011 मध्ये या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, आता एनआयए याप्रकरणी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
 

Tags : Five accused, including Swami Asimanand, were acquitted,