थांबलेली चक्रे पुन्हा कधी फिरणार...

Last Updated: May 11 2020 3:35PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र

अभ्युदय रेळेकर


टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी लोक वणवण करत प्रांतोप्रांती भटकत असतात. मनाजोगं काम मिळालं की त्या ठिकाणी थांबतात. कामाचं प्रमाण वाढू लागलं की तिथेच स्थिरावतात. हीच गोष्ट जगभरात दिसून येते. इंग्लंडहून लोक कामाच्या शोधात अमेरिकेत पोहोचले. तिथे ते स्थानिकांच्या वरचढ ठरले. मग न्यू'यॉर्क' न्यू'जर्सी' असे प्रांत निर्माण झाले. जगात बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येते. मूळच्या लोकांना अनेक कामे माहीत नव्हती. तसेच बहुतांश कामे करण्याची त्यांची इच्छाच नव्हती. उत्खनन, खाणकाम, इमारत बांधणीसाठी जंगलतोड. अशी अनेक कामे आणि त्यांच्या साखळ्या साखळ्या दिसून येतात. त्यातली एक साखळी पाहिली तर जंगलातील लाकूडतोड, तोडलेली लाकडे योग्यपद्धतीने कापणारी यंत्रणा, ही कापलेली लाकडे ती वापरणार आहे अशा ठिकाणी वाहतुकीची यंत्रणा, या कापलेल्या लाकडांपासून विविध वस्तू तयार करणे, या वस्तुंच्या विक्रीची यंत्रणा, या वस्तू विकत घेणारे लोक, या वस्तुंची विक्रीच्या ठिकाणापासून घरपोच करणारी यंत्रणा, या वस्तु खराब झाल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीची यंत्रणा, या वस्तु दुरुस्तीच्या पलिकडे गेल्यावर त्यांची विल्हेवाट लावणारी किेंवा भंगार विकत घेणारी यंत्रणा, या भंगारमधूनही काही कामाचे आहे का ते पाहून त्यांची पुन्हा फेरविक्री करणारी यंत्रणा, या सगळ्या प्रक्रियेतून पूर्णपणे निकामी झालेल्या वस्तू पूर्णपणे नष्ट करण्याची यंत्रणा... येवढ्या सगळ्या चक्रातून विविध प्रकारचे काम विविध हातांना मिळत असते. हे एक प्रातिनिधीक चक्र इथे मांडलं आहे. अशी हजारो-लाखो चक्रे या जगात अस्तित्वात आहेत. प्रत्येकजण यापैकी एखाद्या चक्रात कुठे-ना-कुठेतरी काहीतरी काम करत आहे. कोरोनाने बहुतांश चक्रेच संपूर्णपणे ठप्प झालीत. आता यातल्या कोणत्या चक्रात आपण कुठे आहोत, ते आपले आपणच ठरवा आणि आपण कधी गती प्राप्त करणार याचा अंदाज घ्या.