Sun, Aug 25, 2019 02:07होमपेज › National › एक्झिट पोलसंदर्भातील ट्विट ताबडतोब हटवा; ट्विटरवर निवडणूक आयोगाचा बडगा

एक्झिट पोलसंदर्भातील ट्विट ताबडतोब हटवा; ट्विटरवर निवडणूक आयोगाचा बडगा

Published On: May 16 2019 5:08PM | Last Updated: May 16 2019 5:08PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

गेल्या निवडणुकीप्रमाणे या लोकसभा निवडणुकीतही सोशल माध्यमांनी धुमाकूळ घातला आहे. पक्ष तसेच नेत्यांच्या संबंधित ट्विटना या निवडणुकीतही चांगलाच उत आलेला दिसला. तसेच सोशल मीडियावर सर्वच पक्षाच्या समर्थकांनी आपापल्या पक्षाची तसेच नेत्यांची बाजू अहमकाहमकीने घेतल्याचे दिसून येत आहे. यातच आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होण्यापूर्वीच एक्झिट पोल संदर्भातील ट्विटना भरती आल्याचे दिसून येत आहे. त्यावर निवडणूक आयोगाने बडगा उगारला आहे. हे ट्विट हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक्झिट पोलसंदर्भात कोणतीही वाच्याता करता येणार नाही असा आदेश पूर्वीच निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमे एक्झिट पोलच्या प्रसारणापासून आत्तापर्यंत दूर राहिली आहेत. आता मात्र एकदा का सातव्या टप्प्याचे मतदान झाले की सर्वच माध्यमांच्यावर एक्झिट पोलचा भडिमार होत असल्याचे सर्वांनाच पाहायला मिळेल. मात्र आत्ता ट्विटरवरील एक्झिट पोल संदर्भातील सर्वच मजकूर हटवण्याचे सक्त आदेश ट्विटरला आयोगाने दिले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार एक्झिट पोल संबंधीच्या काही तक्रारी मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, कारण लोकसभा निवडणूका अजून संपल्या नाहीयेत. त्यामुळे एक्झिट पोलसंदर्भातील ट्विट केले जात आहेत, त्यावर या तक्रारीत आक्षेप घेण्यात आला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत सर्व एक्झिट पोलसंदर्भातील ट्विट हटवण्याचे आदेश दिले आहेत. 

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा अजून बाकी आहे. येत्या १९ मे रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतरच एक्झिट पोल प्रसिद्ध करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे.