Sat, May 30, 2020 01:02होमपेज › National › दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा ४२ वर

दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा ४२ वर

Last Updated: Feb 28 2020 3:25PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा ४२ वर गेला असून दंगलीच्या चौकशीची जबाबदारी विशेष तपास पथकाकडे देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक यांना हटविण्यात आले असून त्यांच्या जागी विशेष आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाचा : शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या छिंदमला दणका

गेल्या रविवारपासून ईशान्य दिल्लीत दंगल भडकली होती. दंगलीत आतापर्यंत ४२ लोकांचा बळी गेला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मागील दोन दिवसांत हिंसाचार थांबला असला तरी दिल्लीतील रस्त्यावर दहशतीचे वातावरण आहे. प्रभावित भागात पोलिस आणि सुरक्षा दलांकडून शांततेचे आवाहन केले जात आहे. दंगल हाताळण्यात पोलिसांना अपयश आले असल्याची जोरदार टीका होत असतानाच अमूल्य पटनाईक याना पोलिस आयुक्तपदावरून हटविण्यात आले असून त्यांच्याजागी एस. एन. श्रीवास्तव यांना नेमण्यात आले आहे. 

हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १३ जणांचा मृत्यू गोळी लागल्याने तर इतरांचा मृत्यू वेगवेगळ्या प्रकारच्या जखमांमुळे झाला आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आज हिंसा प्रभावित भागांचा दौरा केला. हिंसाचारात सामील असल्याचा व आयबी अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप असलेला आम आदमी पक्षाचा निलंबित नगरसेवक ताहीर हुसेन हा अजूनही फरारी आहे. ताहीर हुसेनचे घर आणि कारखाना पोलिसांनी सील केले असून या ठिकाणांना आज गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच फॉरेन्सिक विभागाच्या तज्ज्ञांनी भेट देऊन पुरावे गोळा केले.

वाचा : मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण; सरकार अध्यादेश काढणार!

हिंसाचारग्रस्त जाफराबाद विभागात महिला आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. येथील वातावरण चिंताजनक असल्याचे अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले. दिल्लीतील वाढता हिंसाचार चिंतेची बाब असून यासाठी बसपा नेत्या मायावती यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्ली, उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणे तसेच गुरुग्राम आदी ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक धार्मिक स्थळांवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

हिंसाचारासाठी भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आम आदमी पक्षाला जबाबदार धरले आहे. दंगलीत आप नेते सामील असतील तर त्यांना दुप्पट शिक्षा दिली जावी, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. याचा अर्थ ताहीरसोबत त्याच्या आकाला देखील शिक्षा झाली पाहिजे, असा टोला तिवारी यांनी मारला. निर्धारित वेळेत दंगलीचा कट रचणारे व आरोपींना शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तिवारी यांनी केली. हिंसाचाराच्या चौकशीसाठी दोन एसआयटीची स्थापना करण्यात आली असून पोलिस उपायुक्त राजेश देव आणि जॉय टिर्की यांच्याकडे तपासाची सूत्रे असतील.