Tue, Jun 02, 2020 03:25
    ब्रेकिंग    होमपेज › National › भारतातील कोरोनाचे रुग्ण 1024

भारतातील कोरोनाचे रुग्ण 1024

Last Updated: Mar 30 2020 1:26AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गेल्या 24 तासांत भारतात आणखी 8 बळी नोंदवल्याने देशातील एकूण बळींची संख्या 29 वर पोहोचली असून, रुग्ण संख्या 1024 झाली आहे. केंद्राच्या आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोनामुळे मृत्यू होण्यात वय आणि वयामुळे आधीपासून झालेले विविध आजार यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. 

जगभरात कोरोना रुग्ग्णांची संख्या 6.8 लाख आणि बळींची संख्या 30 हजारांवर पोहोचली असताना भारताने देशभर लॉकडाऊन जारी करून ही साथ तूर्तास स्टेज 2 मध्येच रोखली आहे. कठारे उपाययोजनांमुळे अजूनही सामाजिक स्तरावर कोरोनाचे संक्रमण होऊ शकलेले नाही. मुंबईसारख्या महानगरांत झोपडपट्ट्यांमध्ये काही रुग्ण आढळले असले तरी या रुग्णांचाही थेट संबंध विदेश प्रवासाशी आहे. अर्थात या रुग्णांपासून सामाजिक स्तरावर फैलाव होणार नाही याची काळजी घेणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. दुसरे आव्हान म्हणजे लाखोंच्या संख्येने शहरांतून गावाकडे निघालेल्या स्थलांतरीत मजूर. जे स्थलांतरीत गावी जातील त्यांना 14 दिवसांचे सक्तीचे क्वारंटाईन तेही शासकीय व्यवस्थेत आता सक्तीचे करण्यात आले आहे.  

देशातील कोरोनाबाधित संक्रमितांची संख्या रविवारी 1,024 वर पोहोचली. बळींची संख्या आता 27 झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

गेल्या 24 तासांत सहा राज्यांत  कोरोनाचे 106 रुग्ण नव्याने आढळले आहेत. सहाजणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघे महाराष्ट्रातील आहेत. कोरोनाचा संसर्ग नेमका कोणत्या भागांत वेगाने वाढत आहे याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ही ठिकाणे निश्चित झाल्यानंतर तातडीने तेथे युद्धपातळीवर उपाययोजना करणे शक्य होईल, असे पत्रकात म्हटले आहे. 

दरम्यान, देशभरात 86 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये रविवारी आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने  तेथील संक्रमितांची संख्या 20 झाली आहे. कोलकात्यात कर्नल रँकचा एक डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे  आढळले आहे. दोन दिवसांपूर्वीच ते दिल्लीतून परतले आहेत. 

दिल्लीत त्यांच्या संपर्कात असणार्‍या सर्वांची तपासणी केली जात आहे. गुजरातमध्ये रविवारी पाच नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील संक्रमितांची संख्या 63 झाली आहे. बिहारमध्ये चार नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील संकर्मितांची संख्या 15 झाली आहे. उत्तराखंडमध्येही एक रुग्ण नव्याने आढळला. 

कर्नाटकात सात रुग्ण आढळून आल्याने राज्यातील संक्रमितांची संख्या 83 झाली आहे.  तामिळनाडूतही रविवारी सात नवीन रुग्ण आढळले. केरळमध्ये आज सर्वाधिक 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातील संक्रमितांची संख्या 181 वर गेली आहे. गोव्यातही दोन नवे रुग्ण आढळले आहेत.     

मालगाडीतून वस्तूंची वाहतूक

देशात लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी रेल्वेच्या  मालगाडीतून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे. लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू राहिल्याने केंद्राने सर्व राज्यांच्या सीमा सील करण्याचा आदेश दिला आहे. अत्यावश्यक सेवेतील वगळून इतर कोणीही रस्त्यावर आढळल्यास त्यांना 14 दिवसांचे क्वारंटाईन करण्याचा आदेश नव्याने देण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.    

दरम्यान, भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत 34,931 लोकांची तपासणी केल्याची माहिती संस्थेचे प्रमुख डॉ. गंगाखेडकर यांनी दिली.  113 प्रयोगशाळांतून कोरोनाची तपासणी केली जात असून, 47 खासगी प्रयोगशाळांना मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.