Wed, Jul 15, 2020 15:57होमपेज › National › #Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार ? जाणून घ्या सोप्या भाषेत!

#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार ? जाणून घ्या सोप्या भाषेत!

Published On: Jul 22 2019 4:50PM | Last Updated: Jul 22 2019 4:50PM
अमिताभ पांडेय, खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळ विज्ञानतज्ज्ञ    
 

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत भारत सातत्याने प्रगतिपथावर आहे. आपण चांद्रयान पाठविले, मंगळयान पाठविले आणि आता #Chandrayaan2 चांद्रयान-2 चे आज (ता.२२)  यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अंतरिक्ष संशोधनाच्या क्षेत्रात भारत आता स्वावलंबी झाला असून, सक्षम आणि समृद्धही झाला आहे. चांद्रयान-2 मोहीम हा या क्षेत्रातील आपला यापुढील मोठा विजय असणार आहे. जेव्हा 2008 मध्ये भारताने चंद्राच्या दिशेने चांद्रयान-1 पाठविले होते, तेव्हाच असे निश्‍चित करण्यात आले होते, की भारताच्या पुढील चांद्रमोहिमेत एक लँडर आणि एक रोव्हर असेल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर या अभियानाद्वारे दोन आठवडे संशोधन कार्य सुरू राहील. रोव्हरचा अर्थ रोबोटिक गाडी असा होतो. हे स्वयंचलित वाहन चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारेल आणि तेथील सर्व माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवेल. लँडर रशियाकडून घेतले जाईल आणि रोव्हर तसेच ऑर्बिटर भारतीय बनावटीचे असेल, असे आधी निश्‍चित झाले होते; परंतु रशियाने वेळेवर काम पूर्ण केले नाही, म्हणून लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर सर्व काही भारतीय बनावटीचे असेल, असे ‘इस्रो’ने निश्‍चित केले. या दृष्टिकोनातून पाहिले असता चांद्रयान-2 ही भारताची पूर्णतः स्वावलंबी मोहीम असणार आहे.

अधिक वाचा : 'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)

भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही-मार्क-3 या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे कोणताही उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थिर केला जातो. या प्रक्षेपकाचे वैशिष्ट्य असे, की तो तीन हजार किलोपेक्षा अधिक वजनाचा उपग्रह घेऊन अवकाशात झेपावू शकतो. चांद्रयान-2 या मोहिमेत लँडर, रोव्हर, ऑर्बिटर या तिन्हींचे मिळून वजन 3877 किलो एवढे असेल. या मोहिमेच्या आराखड्यानुसार, सर्वप्रथम हे यान त्याच्या निर्धारित कक्षेत पाठविण्यात येईल. ही कक्षा पृथ्वीपासून चाळीस हजार किलोमीटर दूर आहे. एकदा चांद्रयान-2 त्याच्या भूस्थिर कक्षेत स्थिर झाले, की त्याच्या वेगामध्ये वाढ करण्यात येईल. हळूहळू वेग इतका वाढेल, की हे यान हळूहळू चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. हेच काम सर्वाधिक अवघड आहे. कारण, त्या कक्षेत प्रवेश केल्यानंतरच लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरण्यास सज्ज होतील. चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत लँडर आणि रोव्हर 70 अंशांच्या कोनातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. या ठिकाणी जगातील कोणत्याही देशाचे यान अद्याप उतरलेले नाही. या दृष्टीने लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरणे हा भारताचा आणखी एक मोठा विजय असेल. 

अधिक वाचा : #Chandrayaan2 : चंद्राच्या दिशेने आता खऱ्या अर्थाने प्रवास : इस्रो अध्यक्ष के. सिवान

चांद्रयान-2 मोहिमेची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आपल्याला अंतरिक्ष संशोधनाच्या केंद्रात यापुढे प्रगती करायची असेल, तर आपले लक्ष्य चंद्रच असायला हवे; कारण तिथेच आपल्याला जीवनाची नवी दिशा गवसण्याची शक्यता आहे, असे मानले जाते. म्हणजेच, जर आपल्याला अंतरिक्षात वसाहती निर्माण करायच्या असतील, तर सर्वात आधी आपल्याला चंद्रावर तशा शक्यता पडताळून पाहाव्या लागतील. शास्त्रज्ञ, अभियंते आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍यांना चंद्रावर घेऊन जावे लागेल आणि त्यांनी तेथे राहून प्रयोग करावे लागतील. हे लोकच चंद्रावर जीवनाच्या शक्यता पडताळू शकतील. त्यासाठी आधी चंद्रावरील वातावरणाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे आणि या कामी चांद्रयान-2 महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. चंद्रावर पाणी, हवा, किरणोत्सर्ग, रासायनिक घटक आदींची स्थिती काय आहे आणि या घटकांचे प्रमाण किती आहे, या सार्‍याची माहिती आधी घेतली पाहिजे. जगात किंवा अंतरिक्षात कुठेही जगण्यासाठी सर्वप्रथम पाणी आवश्यक आहे. जर पाणी असेल, तरच त्यातून ऑक्सिजन म्हणजेच हवा निर्माण होऊ शकते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा साठा असावा, असे पूर्वीचे संशोधन सांगते. त्यामुळे तेथे जीवनाचे अस्तित्व असणे नाकारता येत नाही.

चांद्रयान-1 जेव्हा पाठविण्यात आले होते, तेव्हा सर्वप्रथम त्याने चंद्रावर पाणी असल्याची माहिती दिली होती. वस्तुतः, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या काही भागांत बर्फ असल्याची ती माहिती होती. या भागात सूर्याचा प्रकाश कधीच पोहोचू शकत नसल्यामुळे गोठलेल्या बर्फाच्या रूपात पाणी तिथे असावे, असे सांगण्यात आले होते. म्हणजेच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असण्याची शक्यता दाट आहे.

चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत सर्वप्रथम या भागात लँडर उतरेल. त्यात अनेक प्रकारची उपकरणे असतील. ही उपकरणे तेथील सौरवादळे, किरणोत्सर्ग, जमिनीवरील मातीत असणारे खनिजांचे अंश आणि इतर घटकांची माहिती घेतील. यातील एक उपकरण असेही आहे, जे लेजर किरण सोडून प्रकाश निर्माण करेल आणि नंतर तेथील घटकांची माहिती देईल. ही सर्व माहिती मिळाल्यानंतरच आपल्याला कळेल की, चंद्रावर जीवनाचे अस्तित्व असणे शक्य आहे की नाही. जीवनासाठी आवश्यक किती घटक तेथे उपलब्ध आहेत आणि किती घटक आपल्याला पृथ्वीवरून घेऊन जावे लागतील, तेही यामुळेच कळणार आहे.

चांद्रयान-2 मोहिमेचा एकंदर खर्च 978 कोटी रुपये एवढा आहे. भारताच्या आजच्या अर्थव्यवस्थेचा आकार पाहता, ही फार मोठी रक्‍कम नाही. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, एक विमान खरेदी करण्यासाठी लागणार्‍या खर्चात ही संपूर्ण मोहीम पूर्ण होणार आहे. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण खूपच कमी आहे. त्यामुळेच तेथे हवाही नाही. त्यामुळे कदाचित चंद्रावर जाताना हवा पृथ्वीवरून घेऊन जावी लागण्याची शक्यता आहे किंवा तेथे पाणी असल्यास सूर्यकिरणांमधील उत्सर्गाच्या माध्यमातून ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे विघटन करता येण्याचीही शक्यता आहे. ऑक्सिजनचा उपयोग हवेच्या स्वरूपात, तर हायड्रोजनचा उपयोग इंधनाच्या स्वरूपात करता येणे शक्य आहे. एकंदरीत, चांद्रयान-2 मोहिमेमुळे आपल्याला अनेक नवनवीन माहिती मिळण्याची शक्यता असून, त्यामुळेच चंद्रावर जीवनाच्या अस्तित्वाची किंवा शक्यतेची माहिती आपल्याला होणार आहे.