Tue, Jul 07, 2020 21:56होमपेज › National › नंदुरबारमध्ये भाजपा निर्विवाद

नंदुरबारमध्ये भाजपा निर्विवाद

Published On: May 24 2019 2:37AM | Last Updated: May 24 2019 2:37AM
नंदुरबार : योगेंद्र जोशी

उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी 95 हजार 629 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. डॉ. गावित या नंदुरबार मतदारसंघातून दुसर्‍यांदा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. डॉ. गावित यांना 6 लाख 39 हजार 136 तर काँग्रेस उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांना 5 लाख 43 हजार 507 मते मिळाली.

उत्तर महाराष्ट्रातली नंदुरबारची जागा आदिवासी बहुल आहे. ही जागा अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव आहे. त्यामुळे येथे भाजपाकडून विद्यमान खासदार डॉ.हीना गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेसतर्फे अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी निवडणूक लढवली. मतदान मोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. पाडवी यांनी आघाडी घेतल्याने डॉ. गावित यांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जसजशा निकाल्याच्या फेर्‍या वाढत गेल्या तसतशा डॉ. हीना गावित यांचा मतदानाचा आकडा वाढत गेला. त्यामुळे निम्म्या फेर्‍यांच्या आतच डॉ. गावित यांनी अ‍ॅड. पाडवी यांना मागे टाकून आधी सात हजारांची आघाडी तर त्यानंतर त्यात वाढ होत जाऊन डॉ. गावित यांनी 80 हजारांपेक्षा अधिकची आघाडी घेत ती कायम ठेवली. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या आपल्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारमधून करत असल्याने इतकी वर्षे इथे काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, आता डॉ. हीना गावित यांच्या रूपाने भाजपाने नंदुरबारमधील मक्तेदारी मोडीत काढल्याचे स्पष्ट होत आहे. या मतदारसंघातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री आणि शिरपूर हे विधानसभा मतदारसंघ येत असून, शहादा आणि नंदुरबारमधून डॉ. गावित यांना मताधिक्य मिळाल्याचे दिसत आहे. वंचित आघाडीचे उमेदवार सुशील आंतुर्लेकर यांनी 25 हजार 594 मते घेतली. तर बसपाच्या रेखा सुशील देसाई यांना 11 हजार 452 मते मिळाली. तर डॉ. सुहास नटावदकर यांना दरम्यान, 21 हजार 9.2 मते मिळाली. तर अर्जुनसिंग वसावे यांनी 2 हजार 935 मते घेतली.

दरम्यान डॉ. गावित यांचा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांशी झालेला वाद आणि त्यामुळे मराठा समाजातून त्यांना विरोध होत असल्याचे चित्र निवडणुकीपूर्वी निर्माण झाले होते. त्यामुळे डॉ. गावित यांना ही निवडणूक गेल्यावेळी सारखी सोपी जाईल असे वाटत नव्हते. तरीदेखील त्यांनी काँग्रेस उमेदवार के. सी. पाडवी यांना जोरदार टक्कर देऊन दुसर्‍यांदा विजय मिळविला आहे.