Fri, Mar 22, 2019 23:52होमपेज › National › बिहारमध्ये 'जेडीयू'बरोबर युती तुटणार नाही : अमित शहा 

बिहारमध्ये 'जेडीयू'बरोबर युती तुटणार नाही : अमित शहा 

Published On: Jul 12 2018 1:26PM | Last Updated: Jul 12 2018 1:27PMपाटणा (बिहार) : पुढारी ऑनलाईन

आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या 'जेडीयू'बरोबर युती कायम राहणार असून ती तुटणार नाही आणि आम्ही सर्व ४० जागा जिंकू, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. 

बिहार दौऱ्यावर गेलेल्या शहा यांनी आज पाटणामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत संबोधित करताना भाजपची भूमिका स्पष्ट केली.

२०१९ मध्ये पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करायचे आहे. सर्व राज्यांत भाजपचे सरकार आले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. त्यांनी यावेळी कॉंग्रेसचे राहुल गांधी यांची जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्याकडे जनता आता चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे, अशी शब्दात त्यांनी टीका केली.
 

शहांनी घेतली नितीश कुमारांची भेट; जागा वाटपावर चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. बिहार दौऱ्यावर गेलेल्या शहा यांनी आज सकाळी नितीशकुमार यांच्याबरोबर सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जेडीयू यांच्यातील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते.

दोन्ही नेत्यांमध्ये रात्रीच्या जेवणावेळी जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत 'एनडीए'बरोबर 'जेडीयू'ची यूती कायम राहील, अशी घोषणा जेडीयूने नुकतीच केली आहे. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू मिळून निवडणूक लढविणार आहे, असेही भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४० पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. मात्र, जेडीयूला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जेडीयूला किती जागा लढविण्यासाठी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.