Tue, Sep 17, 2019 22:34होमपेज › National › अरुण जेटली अनंतात विलीन

अरुण जेटली अनंतात विलीन

Published On: Aug 25 2019 9:50AM | Last Updated: Aug 25 2019 10:04AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे काल शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. अनेक दिवसांपासून दुर्धर आजारांशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली आणि भाजपचा फार मोठा आधारस्तंभ अकस्मात निखळून पडला. जेटली यांच्या अकाली निधनाने मोदी सरकारसह भाजप परिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्यांची अंत्यविधी आज (ता.२५) दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. 

जेटली यांना 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात जीवरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. अँजिओक्रोनोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट आणि नेफ्रॉलॉजिस्टचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ही माहिती मिळताच भाजप तसेच इतर पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयात आणि जेटलींच्या घरी गर्दी केली होती. 

आज पक्षाच्या कार्यकर्त्यांना अरुण जेटलींच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी पार्थिव शरिर भाजपच्या मुख्यालयात सकाळी १०.३० वाजता ठेवण्यात येणार आहे. कार्यकर्ते दुपारी १ वाजेपर्यंत पार्थिवाचे दर्शन घेऊ शकतील. त्यानंतर दुपारी २.३० ला निगमबोध घाटावर अत्यंविधी करण्यात येणार आहेत. 

दोन वर्षांपासून आजारी

अरुण जेटली गेल्या दोन वर्षांपासून सतत आजारी होते. त्यांच्यावर 2018 साली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये कर्करोगाचेही निदान झाले होते, त्यावर त्यांनी अमेरिकेत उपचार घेतले होते. उपचारासाठी न्यूयॉर्कला जावे लागल्याने मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प त्यांना मांडता आला नव्हता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्याकडील अर्थखात्याचा कार्यभार पीयूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला होता. अंतरिम अर्थसंकल्पही गोयल यांनीच सादर केला होता. आजारपणामुळे मोदी-2 सरकारमध्ये ते सामील झाले नव्हते. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex