Sat, May 25, 2019 11:30होमपेज › National › भारताची हवाई ताकद वाढणार

भारताची हवाई ताकद वाढणार

Published On: Jun 14 2018 1:46AM | Last Updated: Jun 14 2018 12:49AMवॉशिंग्टन : वृत्तसंस्था

भारताच्या संरक्षण सामर्थ्यात भर टाकणार्‍या ‘ए. एच. 65 इ अपाचे’ हेलिकॉप्टर व्यवहारास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. अमेरिका 93 कोटी डॉलरमध्ये भारताला 6 हेलिकॉप्टर देणार आहे. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा अंतर्गत तसेच बाहेरील हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सक्षम होणार आहे. या व्यवहारासंदर्भात अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने माहिती दिली आहे. अपाचे अटॅक हेलिकॉप्टरच्या समोरील भागात असलेल्या सेन्सरमुळे रात्रीही हेलिकॉप्टरचे उड्डाण करणे शक्य आहे.

अमेरिकेच्या सुरक्षेसंबंधी महत्त्वाचा विभाग असणार्‍या पेंटागॉनच्या डिफेन्स सिक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सीने यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्णयाची माहिती काँग्रेसला दिली आहे. खासदारांचा विरोध झाला नाही तर ही प्रक्रिया पुढे सरकण्याची आशा आहे.  

बोईंग आणि भारतीय भागीदार टाटाने भारतात अपाचे हेलिकॉप्टरची बॉडी बनवण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मंगळवारी ज्या व्यवहारास मंजुरी देण्यात आली आहे, त्यानुसार अमेरिका भारताला पूर्णपणे तयार असलेले हेलिकॉप्टर विकणार आहे. अशात या व्यवहारावरून टाटा आणि बोईंगमध्ये मतभेद होऊ शकतात. अमेरिकेमध्ये अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचे लॉकहिड मार्टिन, जनरल इलेक्टिक आणि रेथियॉन हे मोठे कंत्राटदार आहेत.