Fri, Jul 03, 2020 16:19



होमपेज › National › ...आणि चक्क आमदाराने मुख्यमंत्र्यांच्या नावाने घेतली शपथ! 

...आणि चक्क आमदाराने मुख्यमंत्र्यांच्या नावाने घेतली शपथ! 

Published On: Jun 13 2019 10:08AM | Last Updated: Jun 13 2019 10:09AM




विजयवाडा : पुढारी ऑनलाईन

आंध्र प्रदेशमधील एका नवनिर्वाचित आमदाराने ईश्वराची शपथ न घेता चक्क मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने शपथ घेतली. नेल्लोर ग्रामीण येथील आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांप्रति विश्वास दाखविण्यासाठी हे पाऊल उचलले आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हेच आमचे देव आहेत, असे म्हटले.

आमदार श्रीधर रेड्डी यांनी जगनमोहन रेड्डी यांचे नाव घेत शपथ घेतल्याने त्यांना सभापतींनी तत्काळ दुसऱ्यांदा शपथ घ्यायला लावली. त्यानंतर आमदार श्रीधर रेड्डी यांनी ईश्वराचे नाव घेत शपथ घेतली.

याबाबत बोलताना आमदार श्रीधर रेड्डी म्हणाले की, मी भावूक झालो होतो. यासाठी नियमांना फाटा देत आपण शपथ घेतली. मी अशा एका गरीब कुटुंबातून आलो आहे ज्याला काही राजकीय पार्श्वभूमी नाही. मला त्यांनी (जगनमोहन) दोन वेळा आमदार बनविले. त्यांच्या नावाने शपथ घेण्यामागे कोणतेही पद मिळवण्याची माझी अभिलाषा नाही. मागील पाच वर्षाचा माझा पगार मी गरीब मुलांना दिला.

याआधी तेलगू देसम पार्टीच्या (टीडीपी) काही आमदारांनी एनटी रामराव यांच्या नावाने शपथ घेतली होती आणि त्यासाठी त्यांना पूर्व परवानगी दिली होती, असा दावाही त्यांनी केला.

जर मी माझ्या नेत्याला देव मानत असेल तर त्यात चुकीचे काय आहे, असेही त्यांनी नमूद केले. आमदार संविधानाच्या अनुच्छेद १८८ मधील नियमांनुसार शपथ घेतात.