श्रीनगर ः वृत्तसंस्था
अनंतनाग येथील दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक मेजर शहीद झाले असून, अन्य तीन जवान जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान मेजर यांचा मृत्यू झाला. जवानांच्या प्रत्युत्तरानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. दरम्यान, जवानांनी चकमकीत एका दहशतवाद्यास ठार केले.
दरम्यान, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी लष्करी ताफ्यास पुन्हा टार्गेट केले. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. लष्करी वाहन बुलेट आणि सुरूंगविरोधी असल्याने दुर्घटना टळली. तथापि, हल्ल्यात चार जवान जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले.
14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यामुळे अवघा देश हादरला होता. या हल्ल्याच्या ठिकाणापासूनच 27 कि.मी. अंतरावर आज पुन्हा जवानांना टार्गेट करण्याचा दहशतवाद्यांनी प्रयत्न केला. आयईडी स्फोटानंतर घटनास्थळी तातडीने बचाव पथकाने धाव घेतली.