Sun, Aug 25, 2019 02:18होमपेज › National › तृणमूलच्या गुंडांमुळे हिंसाचाराचे तांडव : अमित शहा

तृणमूलच्या गुंडांमुळे हिंसाचाराचे तांडव : अमित शहा

Published On: May 16 2019 2:02AM | Last Updated: May 16 2019 1:11AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँगे्रसच्या गुंडांनी हिंसाचाराचे तांडव चालवले आहे. कोलकात्यातील भाजपच्या रोड शोवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि केरोसीन बॉम्बद्वारे हिंसक हल्ला चढविला. सीरआरपीएफच्या जवानांच्या सुरक्षेमुळेच तेथे माझा जीव वाचला, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

बंगालमध्ये भाजपला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने तृणमूलच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोलकाता येथील सात किलोमीटरच्या रोड शोमध्ये सुमारे दोन ते अडीच लाख लोक सहभागी झाले होते. त्या रोड शोवर तृणमूल काँग्रेसकडून हिंसक हल्ला चढविला. तब्बल तीन वेळा दगडफेक झाली. केरोसीन बॉम्ब फेकले गेले. ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिकरीत्या बदला घेऊ, अशी धमकी भाषणात दिली होती. त्यांना प्रचार करण्यापासून का रोखले नाही, असा सवाल करत शहा म्हणाले की, निवडणूक आयोगाने मौन बाळगले आहे. जोपर्यंत गुंडांवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत निष्पक्ष निवडणूक होणार नसल्याचेही ते म्हणाले.