आधारकार्ड जोडणीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Last Updated: Oct 09 2019 11:46PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड बँक खात्यासोबत जोडण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी किसान सन्मान निधी योजना जाहीर केली होती. त्यानुसार शेतकर्‍यांंच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. आतापर्यंत दोन हप्ते वर्ग करण्यात आले असून उर्वरित तिसरा हप्ता लवकरच वर्ग केला जाणार आहे. काही ठिकाणी बँक खात्याशी आधारकार्डची जोडणी नसल्यामुळे अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आधारकार्ड जोडणीसाठीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा देशभरातील सहा कोटी शेतकर्‍यांना फायदा झाला आहे. मात्र प. बंगाल आणि दिल्ली सरकारांनी शेतकर्‍यांची नावे न पाठविल्याने येथील शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत योजनेचा फायदा देता आलेला नाही, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली.

40 लाख वेलनेस केंद्र

चालूवर्षी देशभरात 40 लाख वेलनेस केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य योजनेचा आढावा घेण्यात आला. 
यासंदर्भात बोलताना जावडेकर म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार्‍या 10 लाख आशा मदतनीसांचे मानधन वाढविण्यात आले आहे. त्यांना इतरही सुविधा आगामी काळात दिल्या जाणार आहेत. पाच लाख गावांत जनआरोग्य समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. देशभरात 21 हजार वेलनेस केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजनेंंतर्गत साडेतीन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना कार्ड मिळाले असून, उर्वरित कुटुंबांना ते लवकरच दिले जाईल. प. बंगाल आणि दिल्ली या राज्यांनी या योजनेचादेखील फायदा घेतलेला नाही.