Sun, Jul 05, 2020 04:01होमपेज › National › राष्ट्रपतींना भेटल्या सोनिया गांधी; अमित शहांच्या राजीनाम्याची केली मागणी 

राष्ट्रपतींना भेटल्या सोनिया गांधी; अमित शहांच्या राजीनाम्याची केली मागणी 

Last Updated: Feb 28 2020 2:02AM
 

 

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दिल्ली हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल कायम आहे. आज, गुरुवारी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने एक निवेदन देखील सादर केले. केंद्र सरकार आणि दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली.

वाचा : दिल्लीत हिंसाचार पसरवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर; ५० मोबाईल जप्त

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की, केंद्र सरकारने राजधर्माचे पालन करावे आणि अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून हटविण्यासाठी राष्ट्रपतींनी पावले उचलावीत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील परिस्थिती बिघडली आहे. याबाबत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन सादर केले आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, दगडफेकीच्या घटनांमुळे अनेक लोकांची हत्या झाली. दिल्लीत हिंसाचार सुरु असताना केंद्र सरकार आणि आप सरकार मूकदर्शक बनून राहिले. या प्रकरणी आपण केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रपतींनी दिल्याचे सोनिया गांधींनी सांगितले.

वाचा : कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांच्या मागे ठाम उभे राहणार- अजित पवार

सीडब्ल्यूसी बैठकीत आम्ही दिल्लीतील स्थितीवर अनेक मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर आम्ही राष्ट्रपतींना भेटून त्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. हिंसाचार रोखण्यात गृहमंत्री अपयशी ठरले असून त्यांना या पदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, गेल्या काही दिवसांत दिल्लीत जे काही घडले ते खूप चिंताजनक असल्याचे म्हटले. ही देशाच्या शरमेची गोष्ट आहे. दिल्लीतील परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले, असा आरोप त्यांनी केला आहे.