Tue, Aug 20, 2019 15:50होमपेज › National › नरेंद्र मोदींची संपत्ती पाच वर्षात किती टक्‍क्‍यांनी वाढली? 

नरेंद्र मोदींची संपत्ती पाच वर्षात किती टक्‍क्‍यांनी वाढली? 

Published On: Apr 26 2019 6:49PM | Last Updated: Apr 26 2019 6:49PM
लखनौ : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रादवारे उमेदवाराच्या संपत्तीची माहिती देणे बंधनकारक असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्‍या माहितीनुसार मागच्या पाच वर्षात २०१४ ते २०१९ दरम्यान नरेंद्र मोदींच्या चल संपत्तीमध्ये ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली. नरेंद्र मोदी यांच्याकडे फिक्स डिपॉझिटच्या स्वरुपात जास्त चल संपत्ती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नरेंद्र मोदी यांचे १.२७ कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये असल्‍याची माहिती या प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे. 

नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण २.५ कोटी रुपयांची संपत्ती असून राजकीय पदांमुळे मिळणारा सरकारी पगार आणि बँकांमध्ये असलेल्या ठेवीवरील व्याजातूनच मोदींना पैसा मिळतो. या व्यतिरिक्त त्‍यांचे उत्पन्नाचे दुसरे  कोणतेही साधन नसल्‍याचे या प्रतिज्ञापत्रात म्‍हटले आहे. विशेष म्‍हणजे मोदींच्या नावावर एकच घर

असून त्‍यांच्याकडे एकही गाडी नाही. तर त्‍यांच्या नावावर जमिनही नाही. 

नरेंद्र मोदींचे २०१४ च्या तुलनेत यंदा दुप्पट झाल्याचे दिसून येते. मोदींचे २०१३-१४ साली ९ लाख ६९ हजार ७११ रुपये उत्पन्न होते. तर, २०१८-२०१९ या वर्षात १९ लाख ९२ हजार ५२० रुपये एवढे उत्‍पन्न आहे. सन २०१४ पासून मोदींच्या संपत्तीत दरवर्षी वाढ झाली आहे. परंतु, २०१६-१७ मध्ये मोदींच्या संपत्तीत २०१५-१६ पेक्षा ४ लाख ७० हजार रुपयांची  घट झाली आहे. त्‍यांनतर २०१८-१९ मध्ये मोदींचे वार्षिक उत्पन्न २० लाख रुपये आहे.  

प्रतिज्ञापत्रात दिलेल्‍या माहितीनुसार नरेंद्र मोदींवर कोणत्‍याही प्रकारचा गुन्हेगारी आरोप नाही. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली संपत्ती तीन प्रकारात मोडते. त्‍यात चल, अचल आणि देणी असे वर्गीकरण आहे. ३१ मार्च २०१९ रोजी मोदींकडे ३८,७५० रुपये रोकमध्ये उपलब्ध होते. ४,१४३ रुपयांचा त्‍यांच्याकडे बँक बॅलन्स असून १.२७ कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत. २०१४ साली मोदींकडे ३२ हजार ७०० रुपये रोकडमध्ये उपलब्ध होते. २६.०५ लाख रुपये बँक बॅलन्स होता आणि फिक्स डिपॉझिटमध्ये ३२.४८ लाख रुपये होते.

नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या प्रतिज्ञापत्रात पत्नी जशोदाबेन यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. परंतु, त्यांचा पॅन कार्ड नंबर आणि उत्पन्नाबाबत काही ‘माहित नाही’ असा उल्लेख आहे. याबरोबरच, पत्नीचे शिक्षण, व्यवसाय आणि संपत्तीबाबतही ‘माहित नाही’ असाच उल्लेख केला आहे.