Tue, Dec 10, 2019 13:45होमपेज › National › अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून सलग पाच दिवस सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून सलग पाच दिवस सामूहिक बलात्कार

Published On: Jun 24 2019 4:17PM | Last Updated: Jun 24 2019 4:17PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

आंध्र प्रदेशात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून पाच दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. आंध्र प्रदेशातील ओंगोले शहरात ही घटना घडली. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन तरुणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत असून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्‍यातील महिला सुरक्षेचा प्रश्‍न पुन्‍हा ऐरणीवर आला आहे. गृहमंत्री एस. सुचारित यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्‍याचे आश्‍वासन दिले आहे. 

या घटनेविषयी पोलिस अधीक्षक सिद्धार्थ कौशल यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रकाशम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘१७ जून रोजी पीडित मुलगी ओंगोलेतील आरटीसी बस स्थानकावर उभी होती. यावेळी या पीडित मुलीशी आरोपींपैकी एका तरुणाने मैत्री केली. यानंतर हा मुलगा तिला आपल्यासोबत तिला रुमवर घेऊन गेला. यानंतर त्याने आणि त्याच्या पाच मित्रांनी सलग पाच दिवस या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

या घडलेल्‍या प्रकारानंतर पीडित मुलीने यातून कशीतरी सुटका करुन घेतली. शनिवारी रात्रीच बस स्‍थानक गाठले. त्‍यावेळी  तिथे कर्तव्यावर असणारे होमगार्ड वेंकेटेश्वरलू आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबू राव यांनी तिला पाहिले. तिची आता सुटका केली असल्‍याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. पीडित मुलीस उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती स्‍थिर असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.    

या अल्पवयीन मुलीने दिलेल्‍या तक्रारीनुसार, पोलिस कारवाई करत आहेत. यापैकी एका आरोपीला नेल्‍लोर जिल्‍ह्‍यातून ताब्‍यात घेतले आहे. एका आरोपीला रेल्‍वेने पळून जाण्‍याच्‍या तयारीत असतानाच त्‍याला ताब्‍यात घेतले असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. अशाप्रकारे वेगवेगळ्‍या ठिकाणाहून या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. 

आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक गौतम सावंग यांनी या घटनेचा निषेध केला. महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.