होमपेज › Nashik › सातपूरच्या तरुणास फाशी

सातपूरच्या तरुणास फाशी

Published On: Apr 27 2018 12:58AM | Last Updated: Apr 26 2018 11:18PMनाशिक : प्रतिनिधी

विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न करून विवाहितेसह तिच्या सहावर्षीय मुलाची निर्घृण हत्या करणार्‍या आरोपीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. रामदास शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. 18 एप्रिल 2016 साली सातपूर परिसरात ही घटना घडली होती. त्याचप्रमाणे या हत्याकांडातील मुख्य साक्षीदार सुभाष राजपूत हा न्यायालयात फितूर झाल्याने त्याच्याविरोधातही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

सातपूर परिसरातील कार्बन नाका परिसरात कचरू संसारे हे पत्नी पल्लवी संसारे (30), तीन मुली आणि एका मुलासोबत शिंदे यांच्या घरात भाडेतत्त्वावर राहत होते. सुट्टी लागल्याने तिन्ही मुली गावी गेल्या होत्या, तर कचरू संसारे हे कामानिमित्त रात्रपाळीवर कंपनीत गेले होते. 18 एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास रामदास शिंदे याने घराच्या पाठीमागील दरवाजाने संसारे यांच्या घरात शिरून पल्लवी संसारे यांच्याकडे अनैतिक संबंधाची मागणी केली. त्यास पल्लवीने विरोध केल्याने रामदास याने घरून चाकू आणून पल्लवी यांच्यावर 28 वार केले होते. त्याचवेळी पल्लवी यांचा मुलगा विशाल हा जागा झाल्याने रामदास याने विशालच्या अंगावरही

चाकूने 24 वार करून त्याचा खून केला. या हत्याकांडानंतर रामदासने पल्लवी यांच्या घराला कुलूप लावून पळ  काढला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अजय मिसर यांनी युक्‍तिवाद करीत रामदासविरोधातील पुरावे न्यायालयापुढे सिद्ध केले. या प्रकरणी 22 साक्षीदार तपासण्यात आले, तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुरावा आणि स्पेक्टोग्राफी अहवालाच्या आधारे गुन्हा सिद्ध झाला. सहावर्षीय बालकासह एका विवाहितेची हत्या करणार्‍या आरोपीला समाजात जिवंत राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे समाजात असुरक्षिततेची भावना होईल, त्यामुळे आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जावी, असा युक्‍तिवाद मिसर यांनी अखेरच्या सुनावणीमध्ये केला होता.

आरोपी शिंदे याने कुटुंबातील कर्ता माणूस असून, दोन मुलांचा विचार करत न्यायालयाने कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. तर पल्लवी यांचे पती कचरू संसारे यांनी माझा संसार रस्त्यावर आला असून, तीन मुली मातृत्वाला पोरक्या झाल्याचे न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने गुरुवारी (दि.26) दुपारी दुर्मीळातील दुर्मीळ प्रकरणापैकी एक हे प्रकरण असल्याने आरोपी रामदास यास दुहेरी हत्याकांड प्रकरणी  फाशीची शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही रामदासच्या चेहर्‍यावर पश्‍चातापाची कोणतीच भावना नव्हती. 

फितूर साक्षीदारावरही गुन्हा 

दुहेरी हत्या केल्यानंतर रामदास शिंदे याने त्याचा मित्र सुभाष राजपूतला ठक्कर बाजार येथून फोन करून हत्याकांडाची माहिती दिली होती. पोलीस तपासादरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर सुभाषने रामदास याने खुनाची कबुली दिल्याची साक्ष दिली होती. मात्र, न्यायालयात सुभाष साक्षीदरम्यान, फितूर झाला आणि फोन आला नसल्याचे सांगितले. मात्र, स्पेक्टोग्राफी चाचणी अहवालाच्या आधारे सुभाष आणि रामदासमध्ये झालेले संभाषण समोर आले. त्यामुळे सुभाष याने न्यायालयात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कायदा 193 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. खोटी साक्ष दिल्याबद्दल सुभाष याला सात वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. 

यामुळे झाली फाशी

आरोपी रामदास याला पल्लवीने विरोध करताच त्याने घरून चाकू आणून पल्लवीवर 28 निर्घृण वार केले. यादरम्यान, विशाल जागा झाल्याने रामदासने विशालवरही 24 वार केले. त्यानंतर थंड डोक्याने चाकू धुतला, पल्लवीच्या घराला कुलूप लावून पसार झाला. दोघांवर केलेले वार अतिशय निर्घृण होते, त्यावरून रामदासची विकृत मानसिकता समोर आली होती. तसेच रामदासला कमी शिक्षा दिली, तर समाजात अशा विकृत वृत्तीची मानसिकतेला जरब बसणार नाही आणि समाजावर विघातक परिणाम होतील. महिला आणि बालकांमध्ये प्रतिकारशक्‍ती कमी असते तरीदेखील रामदासने दोघांवर निर्घृण हल्ला केला. त्याचप्रमाणे सरकारी पक्षातर्फे 1973 ते 2017 सालापर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुनावलेल्या फाशीच्या शिक्षांचे दाखले देत हे प्रकरण दुर्मीळातील दुर्मीळ असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने रामदासला फाशीची शिक्षा सुनावली. 

माणूस खोटं बोलू शकेल ; तंत्रज्ञान नाही

या गुन्ह्यातील मुख्य साक्षीदार सुभाष राजपूत हा न्यायालयात साक्षीदरम्यान, फितूर झाला. मात्र, रामदास याने खून केल्यानंतर सुभाषला फोन करून कबुलीजबाब दिला होता. हा कबुलीजबाब सुभाषने मोबाइलमध्ये सेव्ह केला होता. न्यायालयात सुभाष फितूर झाल्याने त्या कबुलीजबाबाचे संभाषण न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तेथे स्पेक्टोग्राफी अहवाल आल्यानंतर रामदासने खुनाची कबुली दिल्याचे सिद्ध झाले. त्यावेळी न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी स्पेक्टोग्राफी अहवाल ग्राह्य धरत रामदासला दोषी ठरवले. तसेच माणूस खोटं बोलू शकेल, मात्र तंत्रज्ञान नाही असाही निष्कर्ष त्यांनी नोंदवला. न्यायालयाव्यतिरिक्‍त अतिरिक्‍त न्यायिक कबुलीच्या आधारे राज्यात पहिल्यांदाच आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्याचा दावा वकील वर्गांकडून होत आहे.

Tags : Nashik, nashik news,satpur murder case,  youth get, death, sentence,