Wed, Mar 27, 2019 04:40होमपेज › Nashik › काकाने शेती हडप केल्‍याने तरूणाची आत्महत्या

काकाने शेती हडप केल्‍याने तरूणाची आत्महत्या

Published On: Jul 29 2018 7:25PM | Last Updated: Jul 29 2018 7:25PMजळगाव : प्रतिनिधी

नुतन मराठा महाविद्यालयातील विद्यार्थ्याने भाड्याने राहणार्‍या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. राहुल पंडीत पाटील (वय, 22 रा. मनवेल ता.चोपडा)  असे आत्‍महत्‍या केलेल्‍या विद्यार्थ्याचे नाव असून, तो राहत असेल्‍या घरमालकाच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राहुल पाटील हा शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात बीएस्सीच्या दुसर्‍या वर्गात शिकत होता. नुकतेच नुतन मराठा विद्यालयातील तासिका सुरू झाल्याने दोन दिवसांपूर्वी जिल्हा पेठेतील गांधी नगरात राहणार्‍या हरीष अशोक नारखेडे यांच्याकडे राहुल याने भाड्याने खोली घेतली होती. त्‍याने शनिवारी रात्री दरवाजा आतून बंद करून पंख्याला फेट्याच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आत्महत्या का करत आहोत याचे कारण कागदावर लिहून ठेवले आहे.

काय आहे सुसाईड नोटमध्ये?
माझे काका दगडू वना पाटील यांना दोन वर्षे शिक्षा मिळावी, कारण त्यांनी माझ्या वलिलांना 3 बिघे चांगली आणि 3 बिघे पोट खराब जमीन अशी वाटनी केली. यातील 3 बिघे पोट खराब जमीन माझ्या पप्पाच्या नावावर केली. मात्र, उर्वरित 3 बिघे चांगली शेतजमीन काका दगडू पाटील यांनी स्वतःच्या नावावर राहू दिली. तसेच वलिलांच्या नावावर असलेली 3 बिघे पोट खराब जमीन पप्पांनी विकण्याचा प्रयत्न केला तर, खरेदी करण्यासाठी आलेल्या दुसर्‍या व्यक्तींना ती जमीन घेऊ नका अशी फुस लावून देत होता. काका दगडू पाटीलसह त्यांची मुले माझ्या वलिलांना धमकी देऊन मारायला येतात. त्या हारामी मुलांना देखील 2 वर्षाची शिक्षा करा. असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. हारामी मुलांनी येत्या 5 दिवसांत 14 लाख रूपये दिले नाही तर, त्यांना अटक करा, असे देखील सुसाईड नोटमध्ये नमूद करून पोलिसांना विनंती केली आहे.

काकांनी वडिलांवर अन्याय केल्याचे केले नमूद
राहुल हा दोन महिन्याचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. त्याला एक मोठी विवाहित बहिण आहे. वडिलांनी दुसरे लग्न केले. त्याला एक सावत्र भाऊ देखील आहे. लहानपणी आई वारल्याने त्याचे संगोपन त्याच्या मावशी आणि मामांनी केले. गेल्या काही दिवसांपासून राहूल हा डिप्रेशनमध्ये राहत होता. आठवडाभरापूर्वी तो मामा जयसिंग गाबा पाटील (रा. वरगव्हाण ता.चोपडा) यांच्याकडे काका दगडू पाटील हा जमीन देत नसल्याची माहिती देत यावर चर्चा देखील केली. यावर मामा जयसिंग यांनी राहुल शांत रहा, कुठल्याच प्रकारचा मानसिक त्रास घेऊ नको, सर्व काही ठिक होईल, असे सांगून त्याला गावाकडे मनवेलला पाठविले. तरीदेखील आपल्यासह वडिलांवर मोठ्या काकांनी अन्याय केला असल्याची भावना त्याच्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. काही दिवसांपूर्वी नुतन मराठा महाविद्यालयात बीएसस्सीच्या दुसर्‍या वर्गाला प्रवेश देखील घेतला. मनवेल वरून ये-जा करण्याऐवजी आपण भाड्याच्या खोलीत राहू याचा विचार करून त्याने जिल्हा पेठेतील गांधी नगरात भाड्याची खोली केली होती.